'जैवविविधता धोक्यात आणली,वादळात उन्मळली'; आता तरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, निसर्गप्रेमींची कळकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 03:50 PM2021-05-22T15:50:16+5:302021-05-22T15:59:37+5:30

अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे.

'Biodiversity threatened'; Stop planting exotic trees now, nature lovers requested | 'जैवविविधता धोक्यात आणली,वादळात उन्मळली'; आता तरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, निसर्गप्रेमींची कळकळ

'जैवविविधता धोक्यात आणली,वादळात उन्मळली'; आता तरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, निसर्गप्रेमींची कळकळ

googlenewsNext
ठळक मुद्देया झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : फार कष्ट न घेता पटकन वाढतात, उंच होतात आणि डोळ्यांना हिरवी दिसतात, म्हणून अगदी सहजपणे आपल्याकडे विदेशी झाडे लावली जातात; पण ही झाडे जैवविविधता नष्ट करत आहेत. त्यामुळे आतातरी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी विनवणी एकीकडे निसर्गप्रेमी करत आहेत, तर दुसरीकडे मात्र वाढवायला कष्ट लागत नसल्याने कितीही कुचकामी ठरत असली, तरी आपल्याला विदेशी झाडेच हवी आहेत.

त्यामुळे खऱ्या अर्थाने जैवविविधता दिन साजरा करायचा असेल, तर सगळ्यात आधी विदेशी झाडांची लागवड थांबवा, अशी सूचना पर्यावरणप्रेमींनी केली आहे. पृथ्वीवरील जैवविविधता अफाट आहे. तिचा योग्य तो अभ्यास होऊन माहितीचा प्रसार झाला, तर या जैवविविधतेचे संरक्षण करता येईल. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघातर्फे २२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. औरंगाबाद शहरातही विदेशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात लावण्यात आलेली ८० टक्क्यांपेक्षाही जास्त झाडे विदेशी जातीची आहेत. यामध्ये ग्लिरिशिडिया, मोहगनी, रेन ट्री, नीलमोहर, पीतमोहर अशा झाडांचा समावेश आहे. या झाडांवर पक्षी, कीटक, किडे राहू शकत नाहीत तसेच या झाडांखाली वनस्पतीही उगवू शकत नाहीत. त्यामुळे ही जैवविविधता नष्ट करणारी झाडे लावू नयेत, असा इशारा निसर्गप्रेमी देत आहेत.

वादळात उन्मळली विदेशी झाडे
किनारपट्टीवर नुकत्याच येऊन गेलेल्या ताैक्ते वादळाच्या प्रलयात अनेक झाडे उन्मळून पडली. यापैकी जवळपास ७० टक्के झाडे ही विदेशी होती. विदेशी झाडांचे लाकूड अतिशय कुचकामी आणि ठिसूळ असते, हे याचे मुख्य कारण. यावरूनही विदेशी झाडे आपल्याकडे तग धरू शकत नाहीत, हे स्पष्ट होते.

फक्त जंगले संरक्षित करा
जैवविविधता वाढीस लागण्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करण्याची गरज नाही. स्वदेशी झाडे टिकली तर निसर्ग आपोआपच तिथे जैवविविधता तयार करत जातो. त्यामुळे आपल्याकडची झाडे, जंगले संरक्षित करा. त्यातील मानवी हस्तक्षेप थांबवा, म्हणजे आपोआपच जैवविविधता वाढीस लागेल. विदेशी झाडे जैवविविधतेला प्रचंड मारक आहेत. त्यामुळे या झाडांची लागवड थांबवली तरीही आपण जैवविविधतेला मोठा हातभार लावू शकतो. विदेशी झाडांच्या लागवडीवर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली आहे. तशाप्रकारचा निर्णय औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रासाठीच घ्यावा.
- मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

Web Title: 'Biodiversity threatened'; Stop planting exotic trees now, nature lovers requested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.