बायोमेडिकल वेस्ट प्रकरणी घाटीला अभय; खाजगी रुग्णालयाचा कचरा सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:22 PM2020-03-03T18:22:04+5:302020-03-03T18:25:58+5:30
रेड्डी कंपनीविरोधात फक्त तक्रार अर्ज
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट महापालिकेच्या घनकचऱ्यात आढळून आल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली होती. महापालिकेने त्वरित रेड्डी कंपनीसह घाटी प्रशासनावरही फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला. रविवारी महापालिकेने यूटर्न घेऊन घाटी प्रशासनाला अभय दिले. सोमवारी एका मोठ्या खाजगी रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट घनकचऱ्यात आढळून आले. खाजगी रुग्णालयावरही फौजदारी कारवाईची प्रक्रिया मनपाने सुरू केली आहे.
शनिवारी पडेगाव परिसरातील तीन नगरसेवकांनी कचरा डेपोवर रेड्डी कंपनीचे तीन हायवा ट्रक पकडले. त्यामध्ये कचरा कमी आणि मुरूम, माती जास्त असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी कचरा, मुरूम-माती आणि दगडांचे वजन केले असता कचऱ्यापेक्षा दगड, मातीचे वजन जास्त भरले. कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी रेड्डी कंपनीने ही चालबाजी केल्याचे उघड झाले.
त्याचप्रमाणे घाटी रुग्णालयातून कंपनीने काळ्या रंगाच्या कॅरिबॅगमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट जमा केले होते. बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी पिवळी, लाल रंगाची कॅरिबॅग वापरण्यात येते. काळ्या रंगाच्या मेनकापडात बायोवेस्ट टाकलेच कसे म्हणून घाटी रुग्णालयावरही फौजदारीचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी मनपा प्रशासनाने यू टर्न घेत घाटीला अभय दिले. रेड्डी कंपनीविरोधातच बायोमेडिकल वेस्ट आणि कचऱ्यात माती, दगड टाकून मनपाची फसवणूक केल्याची तक्रार क्रांतीचौक, बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. सोमवारी सायंकाळपर्यंत रेड्डी कंपनीच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
रेड्डी कंपनीचा दुसरा प्रताप
सोमवारी रेड्डी कंपनीच्या आणखी एका हायवा ट्रकची रमानगर येथे तपासणी करण्यात आली. त्यातही एका खाजगी रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट आढळून आले. हा प्रकार समोर आल्यानंतर नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, प्रभाग अधिकारी एस.आर. जरारे यांनी रमानगर कचरा केंद्रात पाहणी केली. हा कचरा उस्मानपुरा येथील ओरियन सिटीकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा असून, त्यासंबंधीच्या मेडिकलच्या पावत्याही कचऱ्यात दिसून आल्या. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व नर्स यांनीही येथे येऊन पाहणी केली. मनपाने शहरातील सर्व खाजगी, शासकीय रुग्णालयांचे बायोमेडिक वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र मे. वॉटर ग्रेस कंपनीची नेमणूक केली आहे. असे असतानाही खासगी रुग्णालयांचा कचरा रेड्डी कंपनीच्या वाहनांमध्ये आलाच कसा?
भोंबे दोन तासांनंतर आले
घनकचऱ्यात मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट सापडल्याची तक्रार महापौर, आयुक्तांकडे करण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन तास उशिराने घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे घटनास्थळी दाखल झाले. ओरियन सिटी केअर हॉस्पिटलकडून हा जैविक कचरा उस्मानपुऱ्यात रस्त्यावर टाकण्यात आला होता. तो रेड्डी कंपनीच्या कामगारांनी घंटागाडीत भरून आणला. संबंधित रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
जबाबदारी झटकली
रेड्डी कंपनीचे स्वच्छता निरीक्षक नितीन घुसळे यांनी हा कचरा नेमका कुठून आला, याची माहिती नसल्याचे सांगितले. कचरा वर्गीकरण करण्याची जबाबदारी कंपनीची नसून पालिकेची असल्याचे सांगितले. त्यावर जरारे यांनी कंपनीच्या या कर्मचाऱ्यास दम भरताच कचरा वर्गीकरणाची कराराप्रमाणे कंपनीची जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले.