चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत पक्ष्यांची भरारी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 07:48 PM2018-07-30T19:48:45+5:302018-07-30T19:49:28+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, जागोजागी पडलेला कचरा, झाडेझुडपे यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, जागोजागी पडलेला कचरा, झाडेझुडपे यामुळे परिसरात पक्ष्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे विमानतळ परिसरातील पक्ष्यांची भरारी विमानांसाठी धोकादायक ठरू पाहत आहे.
देशातील विविध विमानतळांच्या धावपट्टीवरून टेकआॅफ किंवा लँडिंग करताना विमानांना पक्ष्यांची धडक लागण्याचे प्रकार समोर आले आहेत. चिकलठाणा विमानतळावर रविवारी एका विमानाला पक्षाने धडक दिल्याची घटना समोर आली. चिकलठाणा विमानतळाच्या परिसरातील जयभवानीनगर, म्हाडा कॉलनी आदी भागांतून वाहणारे नाले विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळून आणि काही ठिकाणी थेट विमानतळाच्या परिसरातून जातात. नाले आणि परिसरात जागोजागी पडलेल्या कचऱ्यावर हे पक्षी वाढत असल्याचे दिसून येते. झाडेझुडपांतील कीटकरूपी खाद्यही पक्ष्यांना मिळते. त्यामुळे विमानतळाच्या हद्दीत छोट्या-मोठ्या आकाराच्या पक्ष्यांची संख्या वाढत आहे. याबाबत विमानतळ प्राधिकरणाने वारंवार माहिती दिली, तरीही महापालिकेने या परिसराची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केले.
मोकाट कुत्र्यांचाही प्रश्न कायम
च्विमानतळाच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या नाले, परिसरातील कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. ही मोकाट कुत्रे अनेकदा विमानतळाच्या हद्दीत घुसखोरी करून थेट धावपट्टीवर येतात. त्यामुळे विमानतळावर मोकाट कुत्र्यांची वेळोवेळी धरपकड केली जात आहे; परंतु कुत्र्यांचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे.
लक्ष दिले जाईल
पक्ष्याने धडक मारलेल्या घटनेची चौकशी होईल. चिकलठाणा विमानतळावर यापूर्वी अशी घटना झालेली नाही. यावर्षी परिसरात बगळे वाढले आहेत. पक्षी कुठूनही येऊ शकतात, तरीही या प्रश्नाकडे लक्ष दिले जाईल.
- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ