पक्ष्यांच्या अजब दुनियेत हरवले पक्षीप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:52 PM2018-01-07T23:52:00+5:302018-01-07T23:52:04+5:30
पक्षी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणात तीनशेपेक्षा अधिक पक्षीप्रेमींनी सहभागी होत आगळावेगळा आनंद घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जायकवाडी जलाशयावर आलेले देश-विदेशातील पक्षी, लक्ष वेधणारा त्यांचा रंग, त्यांना आकाशात झेप घेताना, अचूकपणे अन्न टिपण्याची पद्धत अशी पक्ष्यांची न्यारी दुनिया पाहण्यात रविवारी (दि.७) पक्षीप्रेमी हरवले. पक्षी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पक्षी निरीक्षणात तीनशेपेक्षा अधिक पक्षीप्रेमींनी सहभागी होत आगळावेगळा आनंद घेतला.
एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन अॅण्ड एज्युकेशनल अकॅ डमी, चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए), वन विभाग, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग, निसर्ग मित्रमंडळ यांच्या वतीने भानुदासराव चव्हाण सभागृहात आयोजित दोनदिवसीय पक्षी महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. रविवारी सकाळी ७ वाजता जायकवाडी जलाशयावर पक्षी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीनशेवर पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदवीत पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. यामध्ये माजी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पक्षी निरीक्षणाच्या वेळी शॉवेलर, व्हिजन, स्पॉट बिल, पिंटेल, मार्श हॅरिअर, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कुट्स (वारीकरी), ग्रेन हेरॉन, घोंगल्या फोडा, पाणकावळा, शिफ्ट, गोल्डन डक, किंगफिशर, पॉडहेरॉन, ग्रीन बीटर्स, सबस्टेट पोर्चाड, श्याव टिटवा, सिंगल, परपलर्टन पक्षी, कंकर, कोतवाल, बुलबुल, खंड्यासह असंख्य देश-विदेशातील पक्ष्यांची प्रजाती आढळून आल्या. यावेळी पक्षीतज्ज्ञांनी पक्ष्यांविषयी मार्गदर्शन केले.
पक्षी निरीक्षणानंतर भानुदासराव चव्हाण सभागृहात पक्षीतज्ज्ञ अनुज खरे यांनी साईड शोच्या माध्यमातून ‘पक्षी आणि मानव’ याविषयी मार्गदर्शन केले. सायंकाळी ४ वाजता मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उत्तम कळवणे, के.एम. सय्यद, एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन अॅण्ड एज्युकेशनल अकॅ डमीचे अध्यक्ष आणि पक्षीमित्र डॉ. दिलीप यार्दी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
पक्षी महोत्सवासाठी डॉ. अश्विनी यार्दी, रंजन देसाई, अमेय देशपांडे, रामकृष्ण बिडवई, श्रवण परळीकर, स्वप्नील मगरे, अभय कुलकर्णी आदींनी प्रयत्न केले.