भाजप पदाधिकाऱ्याचा वृक्षतोडीचा प्रताप ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 07:18 PM2019-12-11T19:18:28+5:302019-12-11T19:22:04+5:30
हनुमान मंदिरासमोरील मोठी झाडे विनापरवाना तोडण्यात आले.
औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपत वृक्षतोडीवरून राजकीय घमासान सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने वृक्षतोडीवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. दोन्ही पक्षांत वृक्षतोडीवरून वाक् युद्ध सुरू आहे. हा सगळा प्रकार वरिष्ठ पातळीवर होत असताना भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने मंदिरासमोरील वृक्षतोड करण्यास हातभार लावल्याची तक्रार प्रतापनगरातील नागरिकांनी केली आहे. आता या प्रकरणात भाजप काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.
वृक्षारोपण, संवर्धनासाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे, तर दुसरीकडे उच्चभू्र वसाहतीतच वृक्षतोड सुरू आहे, विशेष म्हणजे पालिकेच्या पर्यावरण कक्षाला याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. प्रतापनगर परिसरातील कासलीवाल विहारालगत असलेल्या हनुमान मंदिरासमोरील मोठी झाडे विनापरवाना तोडण्यात आले. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष श्याम थोरात यांच्या सांगण्यावरून ती झाडे तोडण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंदिराच्या कळसावर झाडांच्या काही फांद्या येत होत्या, तेवढ्याच तोडल्या. उर्वरित झाडे कुणी तोडली याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक झाड तुटल्यानंतर मोठा आवाज झाल्यानंतर मी घरातून बाहेर आलो, त्यावेळी झाड पडल्याचे मला दिसून आले. या घटनेला दोन ते तीन दिवस उलटून गेले आहेत. झाडे कुणाच्या सूचनेनुसार तोडली याबाबत वृक्षतोड करणाऱ्यांनी मला काही सांगितले नाही. त्यामुळे मी वृक्षतोड झाल्याबाबत कसे काय सांगणार, असा सवाल त्यांनी केला.
मनपाचे उद्यान अधीक्षक म्हणाले,
पालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, याप्रकरणी मनपाला काहीही माहिती देण्यात आलेली नाही. सदरील ठिकाणी भेट देऊन पंचनामा करून वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.