भाजपा आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तलवार, काठ्यांनी हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 02:34 PM2019-03-24T14:34:30+5:302019-03-24T14:45:42+5:30
लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुंडलिकनगर परिसरातील हुसेन कॉलनीत शनिवारी मध्यरात्री एमआयएम आणि भाजपा कार्यकर्त्यांत जुन्या वादातून जोरदार सशस्त्र हाणामारी झाली.
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना पुंडलिकनगर परिसरातील हुसेन कॉलनीत शनिवारी मध्यरात्री एमआयएम आणि भाजपा कार्यकर्त्यांत जुन्या वादातून जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या हल्ल्यात दोन्ही गटातील सुमारे पंधरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात दंगल,खूनाचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
हुसेन कॉलनीतील रहिवासी एमआयएमचे शहराध्यक्ष मून्शी पटेल आणि भाजपा कार्यकर्ता राहुल चाबुकस्वार यांच्यात जूना वाद आहे. त्यांच्यातील हा वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. कॉलनीतील तरूणांनी आपल्यासोबत राहावे,असा आग्रह त्यांचा असतो. एखादा तरूण विरोधी गटासोबत राहत असल्यास त्या तरूणांला धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार सध्या तेथे सुरू आहे.
राहुल चाबुकस्वार यांच्यासोबत राहणारा रियाज शेख रहीम (वय २९,रा. हुसेन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार २३ मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो घरात झोपलेला असताना घराच्या खिडकीचा पडदा जळत असल्याने त्याने दार उघडून पाहिले असता आरोपी मुन्शी पटेल, अज्जू लाला, सरदार शफीक पटेल, फरहान कुरेशी, जुबेर अफसर पटेल, मोहसीन बागवान उर्फ लल्लायांच्यासह अन्य आरोपींनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात सात जण जखमी झाले. तर मुन्शी पटेल यांच्या तक्रारीनुसार आरोपी जमीर उर्फ गुड्डू, वसीम शेख , रियाज शेख रहिम शेख, अय्याज शेख रहिम, बरकत शेख रहिम, एजाज शेख रहिम, सज्जू उर्फ शहजारी शेख रहिम, राहुल चाबुकस्वार यांच्यासह अकरा जणांनी तलवार, काठ्यांनी हल्ला करून जखमी केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले.