बाजार समितीच्या सभेत गदारोळ; अहवाल पुस्तिकेवर नेत्यांचे फोटो नसल्याने भाजपाचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 07:44 PM2021-09-27T19:44:16+5:302021-09-27T19:56:06+5:30
जुन्या कामांचा रि-ऑडिटचा वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव
औरंगाबाद : वार्षिक अहवाल पुस्तिकेत प्रोटोकाॅलप्रमाणे भाजपा नेते आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्र्यांचे फोटो नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपाचे पदाधिकारी तथा बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला.
बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष होते. माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, रामूकाका शेळके, सर्जेराव पाटील, अशोक पवार, माजी सभापती राधाकिशन पठाडे, माजी संचालक रामबाबा शेळके आदींची उपस्थिती होती. सुरुवातीलाच रामबाबा शेळके यांनी अहवाल पुस्तिकेत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे यांचे फोटो नसल्याचे कारण विचारले. तेव्हा सचिव विजय शिरसाठ यांनी संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आणि ज्यांचे फोटो दिले त्यांची छपाई केल्याचे उत्तर दिले.
विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल
शासकीय प्रोटोकाॅल माहिती नाही
सभेत जगन्नाथ काळे म्हणाले, नवीन संचालक मंडळ असल्याने शासकीय प्रोटोकाॅल काय असतो, हे माहिती नाही. सचिवांनी ते दाखवून दिले पाहिजे होते. यापुढे शासकीय प्रोटोकाॅल पाळण्याची ग्वाही देतो. या उत्तरावर समाधान न झाल्याने जोरदार घोषणाबाजी करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला. दरम्यान, भ्रष्टाचार उघडा पडू नये, यासाठी सभेवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतरही सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये यापूर्वी झालेल्या कामांचे रि-ऑडिट करण्याचा ठराव घेण्यात आला, अशी माहिती सभेनंतर जगन्नाथ काळे यांनी दिली.
माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर