भाजप शहरप्रमुख ते कॅबिनेटमंत्री, आता अतुल सावेंची औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी वर्णीही शक्य
By विकास राऊत | Published: August 9, 2022 06:06 PM2022-08-09T18:06:43+5:302022-08-09T18:08:26+5:30
आ. अतुल सावे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात संधी; भाजपने मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचनेसाठी दिला चेहरा
औरंगाबाद : आ. अतुल मोरेश्वर सावे यांना २०१७ सालापासून मंत्रिमंडळ विस्तारात हुलकावणी दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २०१९ साली त्यांना पाच महिन्यांसाठी राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मंत्री होण्याचे निश्चित होते, मात्र शिवसेना-भाजप युती तुटली आणि त्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले. ते स्वप्न शिंदे सरकारमध्ये पूर्ण झाले आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आ. सावे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यांनी मंगळवारी राजभवनात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. पालकमंत्रिपदी सावे यांना संधी मिळण्याची चर्चा सध्या सुरू आहे.
आ. सावे यांचा १९९८ ते २०१९ पर्यंत हा २१ वर्षांचा राजकीय प्रवास अनेक चढ-उतारांचा असला तरी त्यांनी भाजपशी असलेली नाळ तुटू दिली नाही. शिवसेनेसोबत युतीत असताना त्यांनी नेहमीच संयमाची भूमिका घेत शहरातील राजकारणात काम करताना वेगळा ठसा उमटविला. एक उद्योगकर्मी आणि उद्योगाची जाण असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एक-दोन अपवादात्मक घटना वगळता मागील २४ वर्षांत भाजपसोबत काम करताना त्यांनी १९९८ ते २००३ पर्यंत शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य या पदावर २००३ ते २००६ पर्यंत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
२००६ ते २००९ या काळात ते भाजप जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर भाजप राज्य सरचिटणीसपदावर त्यांनी २००९ ते २०१५ पर्यंत जबाबदारी सांभाळली. पूर्व मतदारसंघातून १९ ऑक्टोबर २०१४ रोजी ते आमदार म्हणून विजयी झाले. १६ जून २०१९ रोजी त्यांना राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुन्हा ९ ऑगस्ट २०२२ रोजी ते कॅबिनेट मंत्री झाले.