फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 04:47 PM2024-11-13T16:47:04+5:302024-11-13T16:48:40+5:30
लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे.
- रऊफ शेख
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाने, तर गेल्या दोन निवडणुकांमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे कंबर कसली आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा राजकीय वारसा सिद्ध करणारी भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चर्चेची झाली आहे.
विलास औताडे यांच्या जमेच्या बाजू
- महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची एकजूट
- वडील माजी आमदार केशवराव औताडे यांच्या जनसंपर्काचा फायदा
- लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली आघाडी
- स्वच्छ प्रतिमा आणि दीर्घ राजकीय अनुभव
उणे बाजू
- मतदारसंघाची भिस्त खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यावरच
- कार्यकर्त्यांपर्यंत उशिराने पोहचले
- निर्णय घेण्यात लागणारा उशीर
- प्रभावी निवडणूक यंत्रणेचा अभाव
- स्वत:चा तगडा जनसंपर्क निर्माण करण्यात अपयश
उमेदवार अनुराधा चव्हाण यांच्या जमेच्या बाजू
- सरकारने घोषणा केलेल्या विविध योजनांचा लाभ
- महिला म्हणून मिळणारी सहानुभूती
- निवडणुकीत पक्षाची प्रभावी यंत्रणा
- जिल्हा परिषदेत व बाजार समितीत सभापतीपदी केलेल्या कामाचा अनुभव
उणे बाजू
- जालना लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेली कमी मते
- हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाल्याने त्यांचा नेटवर्कचा लाभ मिळविण्यात अपयश
- पक्षांतर्गत नेत्यांची नाराजी कायम
- महायुतीतील बंडखोरीमुळे प्रचारात दमछाक
- भाजप सत्तेत असताना देवगिरी कारखाना सुरू करण्यात अपयश