भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली...!
By Admin | Published: January 3, 2017 12:03 AM2017-01-03T00:03:34+5:302017-01-03T00:06:40+5:30
जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही
जालना : निवडणूक काळात दिलेल्या शेतमालाला हमीभावासह इतर आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि कामगारांना बसला आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला.
पाटील म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय कुठलीही तयारी न करता घेतल्याने ग्रामीण भागात आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. या निर्णयामुळे भाजपाला बाजार, जनावरांचा बाजार आदी मार्केट ठप्प असून, त्याचे भावही कमालीचे उतरले आहेत.
एकूणच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हतबल झाला असून, त्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा युती दोन्ही पक्ष सारखेच असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष सोडून इतर छोटे-छोटे पक्ष आणि संघाटनांशी आघाडी करण्यात येणार आहे. संभाजी ब्रिगेड, संविधान मोर्चा, भारत मुक्ती संग्राम, किसानसभा आदी संघटनांना सोबत घेतले जाईल, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतमाल आणि स्वामीनाथ आयोगाबाबत केलेल्या विधानाचा त्यांनी निषेध केला. गत काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
पत्रकार परिषदेस कालीदास आपेट, शिवाजी नांदकिले, बाबूराव गोल्डे, डॉ. आप्पासाहेब कदम, देविदास वाघ, दत्ता पाटील, गोविंद आर्दड, गजानन राजबिंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)