“यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:20 PM2022-02-21T12:20:54+5:302022-02-21T12:22:10+5:30
राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
औरंगाबाद: तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
आघाडी सरकार सुडाचे राजकारण करतेय
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. यावर बोलताना, हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दररोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहेत. सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.