उद्धवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामागे आले भाजप पदाधिकारी 'चुपके चुपके'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:54 PM2024-10-29T18:54:55+5:302024-10-29T18:56:48+5:30
भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांचा सूचक इशारा
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : भाजपमधून उद्धवसेनेत गेलेले सुरेश बनकर यांनी सोमवारी दुपारी २:३० वाजता मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रॅली न काढता सिल्लोड येथील निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे रघुनाथ घरमोडे, रघुनाथ चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर घायवाट, शेख फेरोज, राष्ट्रवादीचे राहुल ताठे, भाजपचे अनेक पदाधिकारी खुलेआम सोबत आले होते; मात्र यावेळी गोची झाली ती भाजप कार्यकर्त्यांची. नेहमी सोबत असणाऱ्या भाजप नेत्यांना बनकर उद्धवसेनेत गेल्याने खुलेआम काम करणे कठीण झाले आहे. यामुळे ते सुरेश बनकर यांच्यामागे गुपचूप उभे राहताना दिसत आहेत. बनकर हे उमेदवारी दाखल करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या गेटमधून आत आले, तेव्हा मीडियाचे प्रतिनिधी समोर उभे होते. यामुळे भाजपचे पदाधिकारी दोन पावले मागे हटले व त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या नेत्यांचा पुढे केले आणि त्यांच्या पाठीमागे ते अर्ज दाखल करण्यासाठी गेले.
सत्तार यांनी लोकसभेत जसे काम केले तसेच काम करणार : मुलतानी
याबाबत भाजपचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्याप्रमाणे अब्दुल सत्तार यांनी लोकसभेत युतीचे काम केले, त्याप्रमाणेच आम्ही इमानेइतबारे सिल्लोड येथील स्थानिक भाजप पदाधिकारी सत्तार यांचे काम करीत आहोत.
पोलिसांनी इशारा देताच ढोल केले बंद
सोमवारी मनोज जरांगे-पाटील समर्थक एका उमेदवाराने दुपारी २ वाजता ढोलताशे वाजवत सिल्लोड शहरातून मिरवणूक काढून उमेदवारी दाखल करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला पोलिसांनी निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच रोखले व ढोल बंद करा, अन्यथा गुन्हा दाखल होईल, असा इशारा देताच त्यांनी ढोल बंद करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर त्यांच्यासोबत होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.