‘भाजप हटाव-देश बचाव’ : भाकपची आजपासून जनजागरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:43 AM2018-08-01T00:43:52+5:302018-08-01T00:46:26+5:30
‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.
यावेळी जिल्हा सहसचिव कॉ. अभय टाकसाळ, कॉ. तारा बनसोडे, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने आदींची उपस्थिती होती. या मोहिमेअंतर्गत १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येतील. १ ते ५ आॅगस्टपर्यंत गंगापूर तालुक्यात, ६ ला वैजापूर तालुक्यात, ७ व ८ आॅगस्ट रोजी सिल्लोड तालुक्यात, ९ व १० आॅगस्ट रोजी फुलंब्री तालुक्यात, ११ आॅगस्ट रोजी कन्नड व औरंगाबाद ग्रामीणमध्ये, तर १२ ते १४ आॅगस्टपर्यंत औरंगाबाद शहरात जथाद्वारे जनजागरण करण्यात येईल. १४ आॅगस्टला मनपा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील.
कॉ. बाहेती म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात काळा पैसा परत आलाच नाही. नोटाबंदीचे नाटक करण्यात आले. शेती क्षेत्राचे बेहाल करण्यात आले. विम्याचे पैसे अंबानीला देण्यात आले. बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा करण्यात आली. दलित - अल्पसंख्याकांवर अन्याय, अत्याचार वाढले. पत्रकारांवरील हल्ले वाढले. महिलांवरसुध्दा कमालीचे अत्याचार वाढले. धर्मांध, फॅसिस्ट, कॉर्पोरेट उद्योगाला खैरात वाटणारे हे सरकार पायउतार होणे आवश्यक आहे. म्हणून ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे.