पंकजा मुंडे यांचे उपोषण भाजपने केले ‘हायजॅक’, फडणवीस, दानवे होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 05:20 AM2020-01-24T05:20:16+5:302020-01-24T05:22:17+5:30
भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे औरंगाबादमध्ये २७ जानेवारी रोजी करणार असलेले मराठवाड्याच्या प्रश्नांसाठीचे उपोषण आता भाजपने पक्षाच्या नावाखाली ‘हायजॅक’ केले आहे.
- नजीर शेख
औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेऔरंगाबादमध्ये २७ जानेवारी रोजी करणार असलेले मराठवाड्याच्या प्रश्नांसाठीचे उपोषण आता भाजपने पक्षाच्या नावाखाली ‘हायजॅक’ केले आहे.
औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या एक दिवशीय उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. १२ डिसेंबर रोजी परळीजवळील गोपीनाथ गडावरील भाषणात पंकजा यांनी औरंगाबादमधल्या उपोषणाची घोषणा केली होती. मराठवाड्याच्या पाणी व सिंचनाच्या प्रश्नांवर हे उपोषण असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्या सभेत त्यांचा रोख आणि राग हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता, असे मानले जाते. मात्र आता फडणवीस यांच्यासह इतर नेते उपोषणात सहभागी होणार आहेत. २०१३ मध्ये औरंगाबादेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन राज्य सरकारविरुद्ध केलेल्या उपोषणाचा कित्ता पंकजा गिरवणार होत्या. मात्र पंकजा यांनी स्वतंत्र उपोषण केले असते तर पक्षातील दुहीचा संदेश मराठवाड्यात गेला असता आणि त्यामुळे भविष्यात पक्षाच्या अडचणीत वाढच झाली असती, असे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ैआहे.
३ हजार कार्यकर्ते येणार
पक्षाने पोलीस आणि विभागीय आयुक्त कार्यालयात परवानगी अर्ज सादर केले आहेत. या उपोषणात किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे. उपोषण आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे नसल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी होणार आहेत.