भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:05 PM2024-07-07T15:05:00+5:302024-07-07T15:07:02+5:30
राजू शिंदे यांच्यासोबत १८ जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांनी हातात शिवबंधन बांधले. यावेळी राजू शिंदेंसोबत १८ जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.
राजू शिंदे यांनी भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. शनिवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांनी राजू शिंदे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. मात्र, राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि अखेर आज त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदें यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता राजू शिंदे यांच्या राजकीय भूमिकेचा आगामी विधानसभा निवडणुकांवर कसा परिणाम होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल.
'या' पदाधिकाऱ्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश
- राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप)
- गोकुळ मलके (नगरसेवक भाजप)
- प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप)
- अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी)
- प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष)
- रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष)
- सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट)
- सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप)
- संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप)
- वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष)
- माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य)
- शंकर म्हात्रे
- कैलास वाणी
- प्रवीण कुलकर्णी
- अभिजित पवार
- मयूर चोरडिया
- सौरभ शिंदे
- आकाश पवार
सावे, शिरसाटांना बसणार धक्का?
राजू शिंदे यांनी भाजपला रामराम केल्यामुळे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे आणि पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना धक्का बसला आहे. पूर्व मधील निवडणूक ही अटीतटीची होत असते. तसेच, पश्चिममध्ये आता शिरसाट यांना त्यांच्याच जुन्या पक्षाकडून तगडा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते.
ठाकरे गटामधील इच्छुकांमध्ये नाराजी
ठाकरे गटामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाचे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन कांबळे आणि लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा इच्छुक आहेत. तसेच, माजी जि.प. सदस्य रमेश गायकवाड हे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. यामुळे राजू शिंदे हे उद्धव ठाकरे येत असल्याने इच्छुकामध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.