'नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असंही मुख्यमंत्री म्हणतील'; फडणवीसांचा औरंगाबादमध्ये हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:01 PM2022-05-23T20:01:00+5:302022-05-23T20:13:46+5:30
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी म्हणतोय ना मग औरंगाबादला संभाजीनगर समजा. उद्या ते म्हणतील की दगडाला सोन्याची नाणी समजा आणि नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, असा जोरदार हल्लाबोल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते औरंगाबादमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या जलआक्रोश मोर्चात बोलत होते. औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्याचा मुद्दा तापला असून यावरुन नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेवर भाजपानं धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे.
"हे तर जुम्मे के जुम्मे सरकार...", रावसाहेब दानवेंकडून सरकारचं नामकरण
देवेंद्र फडणवीसांनी मोर्चात संबोधित करताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. "औरंगाबादमधली आजची लढाई ही परिवर्तनाची लढाई नाही. परिवर्तन तर होणारच आहे. पण ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे. आजचा मोर्चा भाजपाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे. जनतेचा आक्रोश आहे. जनतेच्या आक्रोशाला संघटीत करण्याचं काम भाजपानं केलं आहे. थेंब थेंब पाण्यासाठी संभाजीनगरचा माणूस तरसलेला आहे. अशावेळी आम्ही शांत बसू शकत नाही. मी सरकारला इशारा देतो हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा इथं पाणी पोहोचेल. तोवर सरकारला रात्रीची झोप लागू देणार नाही", असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
"आमच्या मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं की आमच्याकडे पाणी येत नाही. तर ते त्याच्यावर काहीच करायला तयार नाहीत. त्यांनी तर सांगितलं की मी म्हणतो म्हणजे सत्य समजा. मी म्हणतो तर संभाजीनगर समजा. मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा. दगडाला सोन्याची नाणी समजा. नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा", अशा कवितेच्या पंक्तीतून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
"यांचे मंत्री जेलात अन् मुख्यमंत्री घरात", रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
पोस्टर फाडाल पण आक्रोशाचं काय?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या जलआक्रोश मोर्चाचं पोस्टर फाडल्याच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. "मला आज कळलं की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमचे पोस्टर फाडले. पण एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही पोस्टर फाडू शकता पण जनतेचा आक्रोश कसा थांबवणार? जेव्हा माझी माय माऊली मनातल्या मनात तुम्हाला शिव्याशाप देते तेव्हा तुम्ही बुडल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरनं आज महाराष्ट्राला हलवून टाकलं आहे. आता मागे हटणार नाही. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोवर भाजपा झोपणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना झोपू देणार नाही. सरकारची कुंभकरणी झोप उघडली नाही तर सरकारला कुणी वाचवू शकणार नाही", असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री 'त्या' आजींच्या घरी जाणार का?
"मला कुणीतरी सांगितलं की आजच्या जलआक्रोश मोर्चात एक ८० वर्षांच्या आजी रिकामी हंडा घेऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी सहभागी झाल्या आहेत. मला एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना विचारायची आहे. तुमच्या घराबाहेर ८० वर्षांच्या त्या झुकेगा नहीं आजी बसल्या होत्या. त्या आजींच्या घरी तुम्ही गेलात. आता पिण्याच्या पाण्यासाठी तरणाऱ्या या आजींच्या घरी तुम्ही जाणार का?", अशी टीका फडणवीसांनी केली.