“उद्धव ठाकरे आजारी आहेत, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा”; भाजपच्या केंद्रीय नेत्याने दिला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 03:49 PM2022-01-01T15:49:38+5:302022-01-01T15:49:54+5:30
बहुमत असताना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हात उंचावून घ्यावी लागते, ही नामुष्की ठाकरे सरकारवर आली, अशी टीका करण्यात आलीय.
औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी आहेत. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाला अनुपस्थित होते. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर तसेच शिवसेनेवर टीका केली होती. मात्र, यातच आता भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करावे, असा पर्याय सुचवला आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) औरंगाबाद येथे आले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या आजारी आहे. अशात राज्याचा कारभार चालवण्यासाठी कुणीतरी मुखिया हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे, असा सवाल दानवे यांनी यावेळी बोलताना केला.
मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बरे वाटावे याच शुभेच्छा
मुख्यमंत्री आजारी असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत. त्यांना लवकर बरे वाटावे, यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांच्या आजारपणामुळे राज्याला सध्या प्रमुखच नाही. अशात कुणाला तरी प्रमुख म्हणून नेमायला हवे. शिवसेनेत एकनाथ शिंदे सारखे नेते आहेत, त्यांना प्रमुख म्हणून नेमायला हवे किंवा राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आहेत, त्यांनाही प्रमुख म्हणून नेमावे, असे दानवे यांनी म्हटले आहे.
सूडबुद्धीने सगळे सुरुय, याचे वाईट वाटतेय
भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर अद्यापही अटकेची टांगती तलवार आहे. याबाबत भाष्य करताना दानवे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणेवर ३०७ दाखल केला. आशिष शेलारांवर मागे गुन्हे दाखल केला. सूडबुद्धीने सगळे सुरु आहे, याचे वाईट वाटत आहे. बहुमत असतानाही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हात उंचावून घ्यावी लागते, ही नामुष्की ठाकरे सरकारवर आली, असा खोचक टोला दानवे यांनी लगावला.