भाजपचे विधान परिषद सदस्य विश्वनाथ अपात्र

By | Published: December 3, 2020 04:08 AM2020-12-03T04:08:39+5:302020-12-03T04:08:39+5:30

चेन्नीथलासह दोन आमदारांविरुद्ध चौकशी करणार तिरुवअनंतरपुरम : केरळ विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांच्यासह दोन आमदारांविरुद्ध ...

BJP Legislative Council member Vishwanath disqualified | भाजपचे विधान परिषद सदस्य विश्वनाथ अपात्र

भाजपचे विधान परिषद सदस्य विश्वनाथ अपात्र

googlenewsNext

चेन्नीथलासह दोन आमदारांविरुद्ध चौकशी करणार

तिरुवअनंतरपुरम : केरळ विधानसभेच्या अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांच्यासह दोन आमदारांविरुद्ध दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. बार घोटाळ्याप्रकरणी चेन्नीथला आणि के. एम. शाजी यांची बेहिशोबी संपत्तीप्रकरणी चौकशी करण्यास विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांनी परवानगी दिली आहे, असे सूत्रांनी सांगतिले.

गुजरात भाजप आमदार भारद्वाज यांचे निधन

अहमदाबाद/चेन्नई : गुजरातमधील भाजप आमदार अभय भारद्वाज (वय ६६) यांचे चेन्नईतील इस्पितळात निधन झाले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे फुफ्फुस पूर्णत: निकामी झाले होते. त्यामुळे विशेष उपचारासाठी त्यांना ९ ऑक्टोबर रोजी चेन्नईतील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते जीवनरक्षक प्रणालीवर होते. मंगळवारी दुपारी ४.३५ वाजता त्यांचे निधन झाले. यावर्षी जूनमध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते.

खबरीच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी केली हत्या

बिजापूर : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गोंगला गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार नक्षलवद्यांनी रामलू वेंदजाची गळा आवळून हत्या केली, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. यावर्षी ऑक्टोबरमध्येही माओवाद्यांनी पोलिसांचे खबरी असल्यावरुन आपल्या काही सदस्यांसह २५ लोकांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

हिट अँड रन प्रकरणात दंतवैद्यकाला अटक

नवी दिल्ली : भरधाव कारच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी दंतवैद्यक पंकज सुधाकरला अटक केली आहे. १७ नोव्हेंबर रोजी दक्षिण दिल्लीत ही घटना घडली होती. भरधाव कारने ठोकरल्याने रक्तबंबाळ झालेल्या महिलेला रस्त्यावर सोडून आरोपी पंकज पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले.

तृणमूलच्या माजी नेत्याची सीबीआयकडून चौकशी

कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्यातील एक ध्वनीफितीप्रकरणी सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे माजी नेते असिफ खान यांची चौकशी केली. ध्वनीफितीमधील आवाज त्यांचाच आहे. यासाठी त्यांच्या आवाजाच्या नमुन्याची चाचणी करण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. तथापि, काही तांत्रिक कारणांमुळे चाचणी होऊ शकली नाही. २०१४ मध्ये त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर आहेत.

संपत्तीच्या वादातून एकाची हत्या, चार जण जखमी

हरदोई (उत्तर प्रदेश) : संपत्तीच्या वादातून एका व्यक्तीची भोसकून हत्या करण्यात आली, तर त्याच्या कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. खजुरिया पूर्वा गावात मंगळवारी ही घटना घडली. महेंंद्रवर सहा लोकांनी चाकूने हल्ला केला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य चौघे जखमी झाले. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यासाठी वापरलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहे. पोलीस अन्य तीन आरोपींच्या मागावर आहेत.

पशु तस्करांशी संगनमत, आरोपी तीन पोलीस निलंबित

बलिया (उत्तर प्रदेश): पशू तस्करांशी संगनमत असल्याच्या आरोपावरून तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पशू तस्करीत ते सामील असल्याचे आढळले असून मऊ जिल्ह्याच्या सीमेलगतच्या ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पशू तस्करीत सामील असल्यावरुन एका कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली होती.

पाच लाखांचा इनामी नक्षलवादी पोलिसांना शरण

चत्रा (झारखंड): पाच लाखांचे इनाम असलेला नक्षलवादी उदेश गंझू ऊर्फ सुकूल याने शस्त्रासह पोलिसांसमक्ष शरणागती पत्करली. तो तृतीय संमेलन प्रस्तुती समिती या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा उपविभागीय प्रमुख होता. पंधरा वर्षांपासून तो या संघटनेसोबत होता. नक्षलवादी कारवायांशी संबंधित त्याच्यावर ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पित्याने कुऱ्हाडीने केली चार मुलांची हत्या

सिवान (बिहार) : रागाच्या भरात एका व्यक्तीने कन्या आणि तीन मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. या हल्ल्यात त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना मंगळवारी घडली. आरोपी अवदेश चौधरीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येते. त्याला अटक करण्यात आली आहे. पत्नीशी भांडण झाल्यानंतर त्याने पत्नी आणि मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.

आमदाराने धक्का दिल्याने गर्भपात, महिलेचा आरोप

बंगळुरु: भाजपच्या आमदाराने धक्का दिल्याने महिनाभरानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने गर्भपात करावा लागला, असा आरोप एका नगरसेविकेने केला आहे. आमदाराने मात्र आरोपाचा इन्कार केला आहे. नगरसेविका चांदनी नाईकचा आरोप आहे की, नऊ नोव्हेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना नगरभवनात जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात आमदार सिद्दू सावदी आणि त्यांच्या समर्थकांनी धक्का दिला.

अ‍ॅसिड हल्ल्यात चौघांना १४ वर्षे तुरुंगवास

मथुरा : महिला पोलिसावर अ‍ॅसिड हल्ला केल्याच्या गुन्ह्यात जलदगती न्यायालयाने चार युवकांना दोषी ठरवून १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही सुनावला. पाचव्या आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ४ एप्रिल २०१९ रोजी ही घटना घडली होती. आरोपी संजय लग्नासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. तिने सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यांनी अ‍ॅसिड हल्ला केल्याचा आरोप केला होता.

Web Title: BJP Legislative Council member Vishwanath disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.