औरंगाबाद झेडपीत भाजप सदस्य एक दिवसासाठी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 07:18 PM2018-03-14T19:18:14+5:302018-03-14T19:23:07+5:30
आज झालेल्या सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आदेश जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी दिला असताना हा आदेश दुर्लक्षित करीत भाजप सदस्य सदस्य एल.जी. गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले.
औरंगाबाद : आज झालेल्या सर्वसाधारण सभेत परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावे, असा आदेश जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी दिला असताना हा आदेश दुर्लक्षित करीत भाजप सदस्य सदस्य एल.जी. गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले. तसेच अध्यक्षांनी बसण्यास सांगताच चिडून त्यांनी, " अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा " असा थेट आरोप अध्यक्षांवर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या अध्यक्षांनी गायकवाड यांचे सदस्यत्व तडकाफडकी एक दिवसासाठी निलंबित केले.
आज बुधवारी जिल्हा परिषदेत अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होती. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. सुरुवातीला इतिवृत्ताच्या अनुपालनावर चर्चा सुरू झाली. तेव्हापासूनच भाजप सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले. यातच अद्यापही भाजपच्या ६ सदस्यांना विकासकामासाठी एक रुपयाही निधी दिलेला नाही, याचे सभागृहाला उत्तर द्यावे, असा आग्रह एल.जी. गायकवाड यांनी धरला. गायकवाड यांच्या आग्रहानुसार अर्थसभापती विलास भुमरे यांनी ३१ मार्चअखेरपर्यंत वंचित ६ सदस्यांना निधी देण्याचे आश्वासन दिले; परंतु भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
आदेशाकडे केले दुर्लक्ष
सभागृहात गोंधळ वाढत चालला असताना अध्यक्षांनी सदस्यांना आदेश केला, की एकेकाने बोलावे. यावर गायकवाड यांनी बोलणे सुरूच ठेवले. तेव्हा अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सांगताच त्यांनी चिडून, " अगोदर आपल्या पतीची लुडबूड थांबवा व स्वत: निर्णय घ्या " असे म्हटले. हे वाक्य ऐकताच अध्यक्षांचा पारा अधिकच चढला व त्यांनी एल. जी. गायकवाड यांना एक दिवसासाठी निलंबित केले.