भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 07:55 PM2020-12-07T19:55:04+5:302020-12-07T20:01:15+5:30
अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीतील कार्यक्रमात बागडेंच्या उपस्थितीत मारला टोला
फुलंब्री : राज्यात युतीच्या सत्तेत हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी सभागृहात मला बोलण्याची फार कमी संधी दिली. याउलट ते माझ्यापेक्षा एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची जास्त संधी देत होते. त्यामुळे भाजप आणि एमआयएमचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाही, असा टोला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात बागडे य यांना लगावला.
खामगाव फाटा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार होते. यावेळी व्यासपीठावर हरिभाऊ बागडेही उपस्थित होते. अब्दुल सत्तार आपल्या खास शैलीत म्हणाले की, भाजप आणि एमआयएमचे संबंध काय आहेत, हे अजूनही बहुतांश लोकांना कळलेले नाहीत. त्यात मीसुद्धा आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जहरी टीका करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत होता. बागडे यांच्यासंबंधीची तक्रार करताना अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या आमदारास त्यांच्याकडून सातत्याने प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला पणनचे संचालक शिवाजी दसपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार शीतल राजपूत, सहायक निबंधक विष्णू रोडगे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, शिवाजी पाथ्रीकर, प्रभाकर आदी उपस्थित होते.
केंद्राकडून सूडाचे राजकारण
खैरे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारला अनेक संघटना व उद्योजकांनी आर्थिक मदत केली. मात्र, केंद्राने राजकीय सूडापाेटी महाराष्ट्राला एका रुपयाचीही आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप केला.
कृषी विधेयकाबाबत अफवा
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकरी आपला शेतीमाल कोठेही आणि कोणालाही सहज विक्री करू शकतो. मात्र, विरोधक अफवा पसरवून शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. मागील वर्षी मका खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली; पण राज्याला खरेदीसाठी लागणारा बारदानाही उपलब्ध करता आला नसल्याची टीका त्यांनी केली.