भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:42 PM2024-09-06T12:42:42+5:302024-09-06T12:49:07+5:30

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांनी गुरूवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

BJP MLA Prashant Bamb's dance performance video from worker meeting goes viral  | भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स

भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा नृत्याविष्कार व्हायरल; कार्यकर्ता मेळाव्यात केला तूफान डान्स

- सुनील घोडके
खुलताबाद:
गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचा कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील नृत्याविष्काराचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री म्हैसमाळ येथील कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.

गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांनी गुरूवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दुपारी २ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होता. यात रात्री ७ वाजेपासून आर्केस्ट्रा सुरू होता. यावेळी आमदार बंब देखील स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी स्टेजवर जात 'खाई के पान बनारस वाला' या गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या डान्स स्टेप पाहून सारेच अवाक झाले. आमदार बंब यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

महाविकास आघाडीकडून गुरुवारीच केली होती टीका
अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पीके पाण्यात असून, अनेक ठिकाणी पीके आडवे झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे, तालुक्यात चिखलमय रस्त्यातून बैलगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांना आली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांना शेतकरी व मतदारसंघातील जनतेशी काही घेणे देणे नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे कृष्णा डोणगावकर, किरण डोणगावकर, विलास चव्हाण, डॉ ज्ञानेश्वर नीळ यांनी गुरूवारी खुलताबाद तहसील कार्यालयात केलेल्या निदर्शनात केला होता. त्यानंतर आ. प्रशांत बंब यांचा म्हैसमाळ येथील गुरूवारी रात्री आयोजित आर्केस्ट्रात नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतदारसंघात उसटसुलट चर्चा सुरू आहे.

दुसऱ्या भाजपा आमदाराचा डान्स व्हिडिओ व्हायरल
आर्णी- केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत ठेका धरल्याचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता गंगापूर- खुलताबाद मतदारसंघाचे भाजपा आ. प्रशांत बंब यांचा कार्यकर्ता मेळाव्यातील डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Web Title: BJP MLA Prashant Bamb's dance performance video from worker meeting goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.