मराठवाडा पदवीधरसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:22 PM2020-11-09T13:22:16+5:302020-11-09T13:40:45+5:30

भाजपमध्ये अचानक उमेदवारीसाठी स्पर्धा लागल्यामुळे मुख्य दावेदार असलेले शिरीष बोराळकर यांची घालमेल वाढली होती.

BJP nominates Shirish Boralkar for Marathwada graduate election | मराठवाडा पदवीधरसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी

मराठवाडा पदवीधरसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी

googlenewsNext
ठळक मुद्दे उमेदवारीवरून भारतीय जनता पार्टीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, पक्ष प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्यात शीतसंघर्ष. महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजपाला उमेदवारी देताना कधी नव्हे तो एवढा विचार करावा लागला.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात कधी नव्हे ते भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजपचे माजी खासदार जयसिंग गायकवाड,  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते किशोर शितोळे आणि पंकजा मुंडे यांच्या गटातील प्रवीण घुगे यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतले घेतले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बोराळकर यापूर्वीच्या पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सतीच चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजवर ६४ इच्छुक उमेदवारांनी १३६ अर्ज घेतले आहेत. १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज देणे आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. आजपर्यंत कुणीही अर्ज दाखल केलेला नाही. भाजपमध्ये अचानक उमेदवारीसाठी स्पर्धा लागल्यामुळे मुख्य दावेदार असलेले शिरीष बोराळकर यांची घालमेल वाढली होती. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला होता. जिल्ह्यांत विद्यापीठ, बँकेमुळे नेटवर्क आणि मराठा क्रांती मोर्चात सक्रिय सहभाग तसेच मराठा कार्ड म्हणून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा किशोर शितोळे यांना होती. तर ओबीसी चेहरा म्हणून प्रवीण घुगे यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मागील दोन निवडणुकांपासून सतीश चव्हाण हे नेतृत्व करीत आहेत. यावेळी मतदारसंघावर वर्चस्व मिळावे यासाठी राजकीय, सामाजिक समीकरणांचा विचार करून भाजपने बोराळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे. इकडे अद्याप महाविकास आघाडीचा निर्णय न झाल्यामुळे आ. चव्हाण यांनीही देव पाण्यात ठेवले आहेत.   

उमेदवारीवर फडणवीसांचा वरचष्मा 
औरंगाबाद विभागातून शिरीष बोराळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने, प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्या गटातून शितोळे तर माजी मंत्री मुंडे या प्रवीण घुगे यांच्यासाठी प्रयत्नशील होते अशी चर्चा भाजपाच्या गोटात होती. या सगळ्या चर्चेत फडणवीस यांचा वरचष्मा, हुकुमत कायम राहून बोराळकर यांना उमेदवारी जाहीर होईल, असा दावा ही पक्षातील काही जण ‘ऑफ दी रेकॉर्ड’ बोलताना करीत होते. फडणवीस यांच्या संमतीविना काहीही निर्णय होत नाही. निर्णय घेताना प्रदेशाध्यक्षांनाही त्यांना विचारावेच लागते. असा विरोधकांचा आरोप आहे. भाजपाची मराठवाड्यातील उमेदवारी जाहीर होण्यास होणारा विलंब त्या आरोपाला पुष्टी देणारा ठरला. तसेच बोराळकर यांना उमेदवारी देऊन फडणवीस यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावले असल्याची चर्चा आहे.

उमेदवार निवडीसाठी भाजपने प्रथमच घेतला वेळ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भारतीय जनता पार्टीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, पक्ष प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्यात शीतसंघर्ष सुरू असल्यामुळेच उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागात उमेदवारी देताना सर्व जातीय समीकरणे जुळविण्याच्या प्रयत्नात निर्णय होत नसल्याचे दिसले. महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजपाला उमेदवारी देताना कधी नव्हे तो एवढा विचार करावा लागला.

Web Title: BJP nominates Shirish Boralkar for Marathwada graduate election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.