भाजप कार्यालयाचे सेना आमदारांच्या हस्ते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:47 AM2017-09-11T00:47:33+5:302017-09-11T00:47:33+5:30
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीत काँग्रेसला लढत देण्याची हवा निर्माण करणाºया भाजपच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन रविवारी शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचवेळी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख यांनी मात्र पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाचा नारळ आपणच फोडल्याचे सांगितले आहे.
नवीन नांदेडातील ओम गार्डन येथे भाजपाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी आयोजित केला होता. उद्घाटक म्हणून शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती तर यावेळी भाजपाचे शहर महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, चैतन्य देशमुख, डॉ. अजित गोपछडे, भगवानराव आलेगावकर, दिलीपसिंग सोडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर झालेल्या सभेत पक्षाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आ. चिखलीकरांच्या रुपाने भाजपाला मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रतापाने महापालिकेवर आमचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चैतन्यबापू देशमुख यांनी यावेळी महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. आ.चिखलीकर म्हणाले, जनतेचे काम करताना आपण कोणत्या पक्षात आहोत हे महत्त्वाचे नसते. आपण किती प्रश्न सोडवतो, याला महत्त्व आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये आपण काम केल्याचे सांगताना पक्ष वाढवण्याचे काम सातत्याने केल्याचेही ते म्हणाले. रामराव केंद्रे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमास बालाजी गिरगावकर, दिलीप ठाकूर, संतोष वर्मा, सुरेंद्र घोडजकर, शीतल खांडिल, विजय गंभीरे, मनोज जाधव, विपुल मोळके, धनराज मंत्री, महिला आघाडीच्या धनश्री देव, डॉ. शीतल भालके, अरुंधती पुरंदरे, महादेवी मठपती आदींची उपस्थिती होती.
भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन सेनेचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते केल्याबाबत प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. देशमुख यांना विचारले असता कार्यालयाच्या उद्घाटनाचे नारळ आपल्याच हस्ते फोडल्याचे ते म्हणाले.