मराठी माणूस एकवटला म्हणून भाजप घाबरला; इम्तियाज जलील यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:08 PM2022-10-18T17:08:04+5:302022-10-18T17:08:19+5:30
'आता एक गुजराती नाही तर मराठी माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे'
औरंगाबाद: मराठी माणसाला कमजोर करण्याचे काम भाजपच्या अमित शहा यांच्याकडून सुरु आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत मराठी शक्ती एकवटल्याने भाजपने घाबरून माघार घेतली, अशी बोचरी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. गुजराती लोकांचे महाराष्ट्रातील वाढत्या वर्चस्ववाला हा एकप्रकारे हादरा आहे, असेही खा. जलील म्हणाले.
अंधेरीतील पोटनिवडणुकीतून शेवटच्या क्षणी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाकडून जागा घेऊन लढत असलेल्या मतदारसंघात भाजपच्या माघारीवरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारासाठी संपूर्ण मराठी शक्ती एकवटली होती. आपले काय हाल होतील, पराभव दिसत असल्याने भाजपने ऐनवेळी माघार घेतली. तसेच आता एक गुजराती नाही तर मराठी माणूस आमदार होईल याचा मला आनंद आहे, असेही खा. जलील म्हणाले.
भाजप मुंबईसाठी ताकद लावणार
मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे एकमेव उद्देश्य भाजपचे आहे. बीएमसी गेली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेल. यासाठी अमित शहा राज्यातील नेत्यांना आदेश देत असतात. भाजपचा अंधेरी निवडणुकीत पराभव झाला असता तर पुढे बीएमसी निवडणूक अधिक अवघड झाली असती.यासाठी नियोजन पूर्वक राज ठाकरे यांच्या माध्यमातून भाजपने हि खेळी केली, असा आरोपही खा.जलील यांनी केला. ते आज एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.