बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 08:08 PM2024-08-24T20:08:45+5:302024-08-24T20:09:00+5:30
नाजूक घटनेवरही विरोधक राजकारण करीत असल्याचा मंत्री अतुल सावे यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर: बदलापूर येथील घटनेतील नराधमांविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा आंदोलक देत होते.
बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन छेडल्याचे समजातच भाजपनेही आंदोलनाची हाक दिली होती. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी क्रांतीचौक येथे भाजपने निदर्शने केली. बदलापूर येथील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, दीपक ढाकणे, लक्ष्मिकांत थेटे, जालिंदर शेंडगे, समीर राजूरकर, अमृता पालोदकर, वर्षा साळुंके, मनीषा भंसाळी, डॉ. उज्वला दहिफळे, मीना मिसाळ, शितल खरात,आशा खरात,सुवर्णा धानोरकर, जयश्री दाभाडे, लक्ष्मण शिंदे, मनोज पांगारकर, अशोक दामले, बबन नरवडे, महेश माळवदकर, ज्ञानेश्वर गायकवाड, अर्जून गवारे,संतोष बोधक भाजपच्या विविध विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्त्री -पुरूष समानतेची घेतली शपथ
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारतमातेला स्मरून स्त्री पुरूष समानतेची शपथ घेतली. यापुढे कुटुंब आणि सामाजात स्त्री, पुरूष समानतेची जाणीव व जागृतीसाठी अखंड प्रयत्न करण्यात येईल, वयाने ज्येष्ठ, कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर ठेवण्याचे कर्तव्य राहिल. स्त्रीशिक्षणाला आणि त्यांचे कल्याण, त्यांच्या प्रति सुरक्षिततेसाठी प्राणपणाने कार्य करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. स्त्रियांचा आदर, सन्मान न जपणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढण्याचे ध्येय राहिल, स्त्रियांप्रती छत्रपती शिवरायांचा आदर्श अखंडपणे समोर ठेेवेन असे या शपथेत नमूद करण्यात आले.
स्त्री,पुरूष समानतेबाबत जनजागृती करणार
चिमुरडीवरील अत्याचाराच्या नाजूक घटनेवर महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याचा आरोप मंत्री अतुल सावे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलाना केला. ते म्हणाले की, चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना फाशी व्हावी, ही समाजाची भूमिका आहे. आज आम्ही येथे स्त्री-पुरूष समानतेची शपथ घेतली. शिवाय आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्त्री,पुरूष समानतेबाबत समाजात जनजागृती करणार आहेत.