एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले
By मुजीब देवणीकर | Updated: January 2, 2024 15:10 IST2024-01-02T15:07:18+5:302024-01-02T15:10:21+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने साधली किमया, ठाकरे गटास ठेवले सहज दूर

एकाच ‘नावे’मध्ये भाजप, शिंदे गट स्वार; पण येथेही संजय शिरसाट बाहेरच राहिले
छत्रपती संभाजीनगर : महाआघाडीतील भाजपचे मंत्री, शिंदे गटातील आमदारांना एकाच ‘नावे’मध्ये बसवून मुक्तपणे विहार करण्याची संधी सोमवारी सायंकाळी महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली. दहा मिनिटे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. जैस्वाल, मनपा प्रशासक जी. श्रीकांत नौकानयनात सहभागी होते. नाव पायाने पँडल मारून पुढे न्यायची होती. ही जबाबदारी प्रशासकांनी घेतली.
एन-८ येथील नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. उद्यानाच्या परिसरातील तलावात बीओटी तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या बोटिंगचे लोकार्पण अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. छोटेखानी कार्यक्रमास आ. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, माजी नगरसेवक अनिल मकरिये, मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे, रेखा जैस्वाल, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड, अंकुश पांढरे, मंगेश देवरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, विश्वनाथ राजपूत यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले.
शिरसाट येथेही बाहेरच
उपस्थित मान्यवर लाईफ जॅकेट घालून नावेमध्ये बसण्यासाठी सरसावल्यावर संजय शिरसाट यांनी सर्वांची रजा घेतली. नावेत का बसला नाहीत, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले, ’नको रे बाबा...बुडालो तर?’ असे म्हणून ते निघून गेले.
कोण काय म्हणाले ?
क्रिकेट स्टेडियमसाठी निधी
मुख्यमंत्र्यांचे शहरावर विशेष प्रेम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी निधी मिळवू देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही अतुल सावे यांनी प्रशासकांना दिली.
जैस्वाल म्हणाले, आमच्याकडे लक्ष द्या
शहराच्या इतर भागांतही अशा पद्धतीची उद्याने विकसित करावीत, अशी सूचना आ. प्रदीप जैस्वाल यांनी प्रशासकांना केली. मध्य मतदारसंघात सिद्धार्थ उद्यान आहे. आमखास मैदानाजवळ लवकरच ॲडव्हेंचर पार्क तयार होत आहे. हर्सूल भागात वॉटर पार्क, सातारा देवळाईतही उद्याने विकसित केल्याचे प्रशासकांनी सांगितले.
सावे साहेब, आमच्याकडे जास्त विकास करा
मंत्री असलेल्या मतदारसंघात कामे होतातच, कृपया आमच्या मतदारसंघात जास्त कामे करा, असा टोला संजय शिरसाट यांनी अतुल सावे यांना मारला. सावे लगेच म्हणाले, म्हाडाचा प्रकल्प तुमच्या भागातच घेतला. जैस्वालांच्या मतदारसंघातही प्रकल्प सुरू आहे.