भाजप-शिवसेनेच्या वॉर्डांत ‘ट्रॅक्टर’ चा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:20 AM2019-05-29T00:20:14+5:302019-05-29T00:20:37+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या वॉर्डांत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (निशाणी ट्रॅक्टर) यांनी जोरदार मते घेतल्याची माहिती मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून समोर येऊ लागली आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवक असलेल्या वॉर्डांत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (निशाणी ट्रॅक्टर) यांनी जोरदार मते घेतल्याची माहिती मतदान केंद्रनिहाय आकडेवारीवरून समोर येऊ लागली आहे.
खुल्या प्रवर्गातील वॉर्डांत ‘ट्रॅक्टर’ने अक्षरश: धुमाकूळ घातल्यामुळे शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचा आरोप पक्षांतर्गत बैठकांमध्ये होऊ लागला आहे. वॉर्डनिहाय मतदानाच्या आकडेवारीवरून शिवसेनेत मोठे फेरबदल होणे निश्चित असल्याचे मानले जात असून, भाजप पूर्व मतदारसंघातील एमआयएम आणि अपक्ष उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे चिंतेत आहे. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातून जाधव यांना मतदान झाले. एन- ५, एन- ६, जयभवानीनगर, विश्रांतीनगर, एन- १, एन- २ ठाकरेनगर, पुंडलिकनगर, मेहरनगर, भारतनगर, गजानननगर या भागातूनही अपक्ष उमेदवाराला चांगली मते मिळाली आहेत.
मध्य मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत युती उमेदवाराचा निभाव लागेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. मध्य मतदारसंघातील सुरेवाडी, मयूर पार्क, हर्सूल, पवननगर, हडको, एन-८ या भागातून, तर पश्चिम मतदारसंघातील शिवाजीनगर, वाळूज-पंढरपूर, सातारा-देवळाई, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, उल्कानगरी, वेदांतनगर परिसरातून अपक्ष उमेदवाराला मतदान झाले आहे.
जाधव यांना पूर्व मतदारसंघातून २५ हजार ६१९, पश्चिम मतदारसंघातून ३८ हजार ५७, तर मध्य मतदारसंघातून ३० हजार २१० अशी ९३ हजार ८८६ मते मिळाली आहेत. खैरेंना तिन्ही मतदारसंघांतून १ लाख ८३ हजार १८ मते मिळाली. पूर्वमध्ये शिवसेनेचे व सहयोगींसह १२ नगरसेवक आहेत. पश्चिम मतदारसंघात १३ तर मध्यमध्ये १० नगरसेवक आहेत. भाजपच्या पश्चिम मतदारसंघात सहयोगी नगरसेवकांसह ७ जण आहेत. मध्यमध्ये ९ तर पूर्व मतदारसंघात भाजपचे १० नगरसेवक आहेत. भाजपच्या चिन्हावर आलेल्या आणि पुरस्कृत नगरसेवकांच्या वॉर्डातून अपक्ष उमेदवाराला मतदान चांगले झाले आहे, तसेच शिवसेनेच्या वॉर्डातूनही ट्रॅक्टरने अनपेक्षित मतदान घेतले आहे.
मतदान केंद्रनिहाय चाळणी
जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी केंद्र नावानिशी देण्याऐवजी केंद्र क्रमांकाने दिली आहे. शिवसेनेला भाजप नगरसेवकांच्या वॉर्डातून किती मतदान मिळाले, अपक्ष उमेदवाराला किती मतदान झाले. याची चाळणी सुरू आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी केंद्र आणि नावांची जुळणी करून मतदानाची गोळाबेरीज करीत आहेत. शिवसेना,भाजपच्या वॉर्डातून अपक्ष उमेदवाराला मिळालेले मतदान पाहून सर्वांचे डोळे चक्रावत आहेत.