भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 08:13 PM2019-08-29T20:13:13+5:302019-08-29T20:13:55+5:30
संविधान वाचविण्यासाठी भाजपला रोखा
औरंगाबाद : हळूहळू घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवायचे असेल, तर मतदानाच्या ताकदीतून आरएसएस आणि भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जिग्नेश मेवानी यांनी केले.
संविधान सन्मान यात्रा औरंगाबादेत आल्यावर ते आयोजित सभेला संबोधित करीत होते. रिपाइं नेते तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रल्हाद लुुलेकर, निवृत्ती सांगवे, डॉ. सुशील गौतम, नगरसेवक रवी सोनकांबळे, अशोक पगार आदींची उपस्थिती होती.
आ. मेवानी पुढे म्हणाले की, दुष्काळ व महापुराच्या खाईत मराठवाड्याला ढकलून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या पैशावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला जनतेचे काही देणे घेणे नाही. याचा जाब जनतेने विचारायला हवा. मुस्कटदाबीचे राजकारण जनतेला समजू लागले आहे. गुजरातचा दलित आणि महाराष्ट्राच्या दलिताच्या जोडीला हिंमत देण्यासाठी आला आहे. नामांतर चळवळीत औरंगाबादचे नाव सर्वांना परिचित आहे. दलित क्रांतीचे बीज या शहरातूनच निर्माण झाले आहे. नवीन नेतृत्व विकाऊ नव्हे तर टिकाऊ तयार करण्याची जबाबदारी सामान्य जनतेत आहे. आंबेडकरी जनतेने सर्वांना सोबत घेऊनच राजकीय लढाई लढायची असून, त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणून संविधान सन्मान यात्रा काढावी लागत आहे.
प्रा. लुलेकर यांनी घटनेच्या बाजू कमकुवत करणाऱ्या जातीयवादी संघटनेचे डाव आता तरी तुम्ही ओळखा असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना रमेश गायकवाड यांनी समाजाची होत असलेली वाताहत टाळण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून मतदान घेण्यासाठी पेटून उठावे लागेल, असे सांगितले.
यावेळी कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भीमगीताला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर संयोजकांनी खरात यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पगारे व प्रमोद मगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रात युवकांनी जागरूक व्हावे
शिक्षण ही विकासाची जननी असून, सध्या सोशय मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट अगदी विचारपूर्वक आवश्यकता असेल तरच पुढे टाकाव्यात. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या नाहक आणि व्यर्थ पोस्टला टाकू नये, याविषयी सतत जागरूक असले पाहिजे.