भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विसरले शहराचे नामकरण; पत्रावर 'औरंगाबाद' उल्लेख
By विकास राऊत | Updated: March 2, 2023 16:13 IST2023-03-02T16:13:07+5:302023-03-02T16:13:57+5:30
प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली;त्यानंतर तातडीने बदलले पत्र

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विसरले शहराचे नामकरण; पत्रावर 'औरंगाबाद' उल्लेख
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, देवळाली, देहू, शिवाजीनगर, पुणे येथील छावणी परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी निवडणुक प्रमुख पदासाठी भाजपने काही पदाधिकार्यांनी जबाबदारी देत त्यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली. त्या नियुक्ती पत्रात छत्रपती संभाजीनगर ऐवजी शहराचे नाव औरंगाबाद असे मुद्रीत होऊन आल्यामुळे गुरूवारी एकच गदारोळ उडाला.
प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या लक्षात येताच, त्यांनी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्तीपत्र बदलण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. दुपारपर्यंत दुसरे नियुक्तीपत्र भाजप प्रदेश कार्यालयाकडून आल्याचे भाजप सुत्रांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियातील हँडलवर नवीन पत्र व्हायरल केले.
यांच्यावर दिली आहे जबाबदारी...
पुणे छावणी परिषदेसाठी आ.सुनील कांबळे, शिवाजीनगर आ.सिध्दार्थ शिरोळे, देहू संजय भेगडे, देवळाली बाळासाहेब सानप, अहमदनगर महेंद्र गंधे, छत्रपती संभाजीनगर संजय केणेकर, नागपूर डॉ.राजीव पोतदार यांच्यावर राज्यातील छावणी परिषदेच्या निवडणुक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद आहे.