भाजप श्रेष्ठींचा ‘सीईओं’वरच विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:52 AM2018-01-02T00:52:40+5:302018-01-02T00:52:43+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी झालेल्या भाजप सदस्यांच्या बैठकीत श्रेष्ठींनी अविश्वास ठराव आणून काय साध्य करणार आहात, असा प्रश्न उपस्थित करून अविश्वास ठरावाबाबत अग्रेसर असलेल्या भाजप सदस्यांची हवाच काढून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी झालेल्या भाजप सदस्यांच्या बैठकीत श्रेष्ठींनी अविश्वास ठराव आणून काय साध्य करणार आहात, असा प्रश्न उपस्थित करून अविश्वास ठरावाबाबत अग्रेसर असलेल्या भाजप सदस्यांची हवाच काढून घेतली. तथापि, आज सोमवारी शिवसेना व काँग्रेस सदस्यांनी यासंदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविली.
रविवारी दुपारी भाजप कार्यालयात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्या उपस्थितीत भाजप जि. प. सदस्यांची बैठक झाली. यावेळी पक्षश्रेष्ठींनी ‘सीईओ’विरुद्ध अविश्वास ठराव आणण्याबाबतची भाजपच्या जि. प. सदस्यांची भूमिका जाणून घेतली. तेव्हा सदस्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेत भाजप सदस्यांना ‘सीईओ’ आर्दड हे सन्मानाची वागणूक देत नाहीत. जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी केलेल्या कामांच्या नियोजनामध्ये भाजप सदस्यांना डावलेले. तेव्हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून ते नियोजन ‘सीईओ’ आर्दड यांनी फेटाळले पाहिजे होते. परंतु त्यांची त्यास मूक संमती असते. आर्दड हे पक्षपातीपणाने भाजप सदस्यांना वागणूक देतात, असे ‘सीईओ’ काय कामाचे, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली.
तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी सदस्यांची कानउघाडणी केली. ते म्हणाले की, तुमची नेमकी कोणती कामे ‘सीईओं’नी अडवली. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आलेला असताना ऐनवेळी शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता घेतली. तेव्हा तुम्ही अध्यक्षांवरच अविश्वास आणायचा विचार करायला हवा होता. त्यानंतर दुसºया बैठकीस उपस्थित राहण्यासाठी बागडे बैठकीतून निघून गेले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी भाजप सदस्यांना सल्ला दिला की, ‘सीईओ’ यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका. अगोदर शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या ३० पेक्षा जास्त सदस्यांच्या स्वाक्षºया घ्याव्यात. त्यानंतर आपण यासंदर्भात विचार करू. बैठकीत अविश्वास ठरावाबाबत एकेका सदस्यांची भूमिका जाणून घेण्यात आली. तेव्हा उपस्थित सदस्यांनी मागील ९ महिन्यांत आमचे एकही काम झाले नाही, आर्दड आम्हाला सन्मानाची वागणूक देत नाहीत, अशी खंत बोलून दाखविली. शिवसेना सदस्य आक्रमक
भाजप सदस्यांनी अविश्वास ठराव आणण्याबाबत पुढाकार घेतला होता. पण, रविवारच्या बैठकीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अगोदर शिवसेना व काँग्रेसच्या ३० पेक्षा अधिक सदस्यांनी स्वाक्षºया करू द्या, मग आपण काय करायचे ते बघू, अशी भूमिका घेतल्यामुळे आज सोमवारी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी स्वाक्षरी मोहीम राबविल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वाक्षरी मोहिमेत शिवसेनेचे सदस्य आक्रमक असल्याचे दिसून आले.