औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार; जे.पी. नड्डा सभा घेऊन फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

By विकास राऊत | Published: December 28, 2022 07:47 PM2022-12-28T19:47:15+5:302022-12-28T19:48:29+5:30

लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजप लढणार असून, त्यासाठी मागील काही वर्षांपासून काम करीत आहे

BJP to contest Aurangabad Lok Sabha; JP Nadda will blow the election trumpet with the sabha in Aurangabad | औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार; जे.पी. नड्डा सभा घेऊन फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार; जे.पी. नड्डा सभा घेऊन फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

googlenewsNext

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा २ जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५ वाजता सभा घेणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहेत. नड्डा प्रथमच शहरात येत असून, केवळ पाच दिवसांत सभेचे नियोजन पक्षाला करावे लागणार आहे.

शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी नड्डा यांच्या सभेची पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता नड्डा हे वेरूळ घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. नंतर सभेला येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तिन्ही मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची बैठक नड्डा घेतील. त्यानंतर शहरातील काही महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करतील. सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, सरचिटणीस संजय केणेकर आदींसह सगळे आमदार उपस्थित राहतील.

लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजप लढणार असून, त्यासाठी मागील काही वर्षांपासून काम करीत आहे, असे बोराळकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, कचरू घोडके, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

महापालिकेची तयारी सुरू
महापालिका निवडणुकीत भाजप जास्त जागांवर निवडून येईल. भाजपची तयारी सुरू असून, नवीन वर्षात निवडणुका होतील, असा दावा बोराळकर यांनी केला.

पाच दिवसांत नियोजन
नड्डा यांचा दौरा मंगळवारी रात्री जाहीर झाला. २ जानेवारीपर्यंत सभेचे नियोजन करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची धावपळ होणार आहे. त्यातच सांस्कृतिक मंडळावर गर्दी जमविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

Web Title: BJP to contest Aurangabad Lok Sabha; JP Nadda will blow the election trumpet with the sabha in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.