महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर सर्व जागा लढणार, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 06:27 PM2021-01-21T18:27:19+5:302021-01-21T18:29:24+5:30
Aurangabad municipal elections भाजप म्हणून आम्ही जागा लढवू. तूर्त तरी रिपाइं (ए) सोडता आम्हाला कुणी मित्रपक्ष नाही.
औरंगाबाद : मनपाची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून, वेगळी नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नसल्याचा खुलासा भाजपच्या वरिष्ठ गोटातून करण्यात आला.
मानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, असे काही घडणार नाही. माझा भाजपशी किंबहुना राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्वतः मानसिंग पवार यांनी स्पष्ट केले.औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मानसिंग पवार यांनी सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांची बाजू घेतली होती. मानसिंग पवार म्हणाले, मी नेहमीच राजकारणापासून दूर राहात आलो. आताही मी दूरच आहे.
याच संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, मनपा निवडणुकीच्या राजकारणात माझे पूर्ण लक्ष आहे. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे. मानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नागरी विकास आघाडी स्थापन करण्याचे चालले आहे का, असे विचारता बागडे म्हणाले की, असे काही नाही. भाजप म्हणून आम्ही जागा लढवू. तूर्त तरी रिपाइं (ए) सोडता आम्हाला कुणी मित्रपक्ष नाही. आम्ही भाजप म्हणूनच मनपा निवडणूक लढवणार आहोत. भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यासंदर्भात म्हणाले, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही. भाजप म्हणून आम्ही स्वबळावर सर्व जागा लढविणार आहोत.