महापालिकेसाठी भाजप राबविणार ‘डोअर टू डोअर’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:02 PM2020-03-03T16:02:58+5:302020-03-03T16:09:00+5:30
या अभियानात शहरातील १ लाख कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट ठरविले आहे.
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यांवर घेरण्यासाठी भाजप ‘डोअर टू डोअर’ अभियान राबविणार आहे. या अभियानात शहरातील १ लाख कुटुंबांच्या भेटीचे उद्दिष्ट ठरविले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच आ. सुजितसिंह ठाकूर हे औरंगाबाद मुक्कामी असतील, तर आपण आठवड्यातील दोन दिवस औरंगाबादेत राहणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शनिवारी (दि.२८) दिवसभर संघटनात्मक बैठकांसह नागरिकांच्या भेटी घेतल्या. यात त्यांनी छोट्या-छोट्या समूहांच्या भेटीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यात विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ‘औरंगाबाद फर्स्ट’ या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दीर्घ बैठक घेतली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादच्या विकासाविषयीचा आराखडा मांडला. या आराखड्यातील काही मुद्यांचा समावेश भाजपच्या जाहीरनाम्यात करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
या बैठकीनंतर शहरातील सुज्ञ नागरिकांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात घेतली. यात उद्योग, शिक्षण, व्यापार, विधि, वैद्यकीय, बांधकाम आदी क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश होता. त्या बैठकीतही त्यांनी भाजपला निवडून दिल्यास आपल्यातील काही जणांचा समावेश स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्यात येईल. तसेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा ठरविण्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींची सल्लागार समिती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या दिवसभर घेतलेल्या विविध बैठकांनंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी भाजप ही निवडणूक गांभीर्याने घेत असल्याचे सांगितले. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच आ. ठाकूर हे निवडणूक संपेपर्यंत शहरात मुक्कामी राहतील. त्याच वेळी आपणही आठवड्यातील दोन दिवस औरंगाबादसाठी देणार आहोत. या दोन दिवसांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘डोअर टू डोअर’ भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून भाजप एक लाख कुटुंबांना भेटणार आहे. या भेटीत संबंधित कुटुंबाची ख्याली-खुशाली विचारण्यासह शिवसेनेने केलेली गद्दारी, त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे दाखवून देण्यात येणार आहे. यातून भाजपच्या आगामी निवडणुकीतील रणनीती स्पष्ट आहे.
पदवीधर निवडणुकीवर लक्ष
महापालिका निवडणुकीसोबत चंद्रकांत पाटील यांनी मराठवाडा पदवीधर निवडणुकीवरही लक्ष ठेवले आहे. या निवडणुकीचा आढावाही त्यांनी शनिवारच्या दौऱ्यात घेतला. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मतदार नोंदणीचे सहप्रमुख प्रवीण घुगे यांच्या कार्यालयाला भेट देऊन सूचनाही केल्या आहेत.