भाजप मुख्यमंत्र्यांना ‘जय श्रीराम’ नावाची २५ हजार पत्रे पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:33 PM2020-08-13T17:33:55+5:302020-08-13T17:34:46+5:30
५ आॅगस्ट रोजी शहरातील विविध भागांत आरती करणाऱ्या रामभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औरंगाबाद : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी भाजपतर्फे श्री रामाची आरती करण्यात आली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘जय श्रीराम’ असे शब्द लिहिलेली २५ हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ५ आॅगस्ट रोजी शहरातील विविध भागांत आरती करणाऱ्या रामभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा निषेध म्हणून ही पत्रे आणि मेल पाठविण्यात येणार आहेत. अभियानाच्या प्रमुखपदी प्रमोद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर खासदार डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडामोडे हे मार्गदर्शक आहेत.
पत्रातील मजकूर
५ आॅगस्टला आम्ही प्रभू श्रीरामाची आरती केली. पूजन केले व श्रीरामाचा जयघोष पण केला. आपल्या दृष्टिकोनातून हा जर गुन्हा असेल, तर आमच्यावरही हा गुन्हा नोंदवला जावा, ही विनंती केली जाणार असल्याचेही संजय केणेकर यांनी सांगितले. या प्रसिद्धीपत्रकावर डॉ. राम बुधवंत यांची स्वाक्षरी आहे.