भाजपा महिला कार्यकर्त्यांनी भेट घेत मांडली तक्रार; जरागेंचं मराठा बांधवांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 01:46 PM2024-03-01T13:46:07+5:302024-03-01T13:49:09+5:30
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली
छत्रपती संभाजीनगर - मराठाआरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. रुग्णालयातून आज त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज अचानक भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी, गळ्यात भाजपाचा गमछा घातलेल्या या महिलांनी सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंगचा मुद्दा उपस्थित केला. ''काही कार्यकर्ते सोशल मीडियावरून महिलांना शिवीगाळ करतात'' अशी तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली. त्यानंतर, जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित घटनेवर स्पष्टीकरण दिले. तसेच, मराठा समाज बांधवांना आवाहनही केले आहे.
सोशल मीडियातून महिला पदाधिकाऱ्यांना ट्रोल करणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना देण्याची विंनती महिलांकडून मनोज जरांगे यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात जरांगेंनी मराठा बांधवांना आवाहन केलं असून अशा टीकेचं मी समर्थन करणार नाही, याचा निषेधच. मराठा आणि ओबीसी बांधवांना माझं आवाहन आहे की, महिलांबद्दल कोणीही बोलू नये, मराठा आणि इतरही समाजाच्या पोरांनी महिलांबद्दल अर्वाच्य काहीही बोलू नये, ते मला सहन होणार नाही, तो माझा कार्यकर्ताही असणार नाही, असे आवाहनच मनोज जरांगे यांनी आंदोलक समर्थकांना केलं आहे.
ताई म्हणून यावं, रुमाल घालून येऊ नये
मराठा समाजाचा हा विषय नाही, मग तो टीका करणारा आणि त्या ताई ते बघून घेतील. मात्र, असं करणाऱ्यांचा एकदम निषेध. केवल त्या महिला माझ्याकडे आल्या म्हणून नाही. तर, मला ६-७ महिन्यांपासून तुम्ही सगळे पाहता, महिलेंबद्दल असं काही आपल्याला सहन होऊ शकत नाही. पण, महिलांनीही ताई म्हणून यावं, पक्षाचा म्हणून येऊ नये. कुठे गळ्यात रुमाल घालू येऊ नये. ताई म्हणून आल्यास हा मनोज जरांगे तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहिल. कुठल्याही जाती-धर्माच्या ताईंसाठी मी उभे राहिन, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं.
फडणवीसांबद्दल काय म्हणाले जरांगे
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या आरक्षणाच्या मुद्दयावर आपण ठाम असून लवकरच लवकरच शासनाने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. तसेच, आज पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ''मराठा आमदार, मंत्र्यांकडून फडणवीसांना मराठ्यांची जिरवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना माझी विनंती आहे की, फडणवीस मराठा समाजावर दडपशाही करायला लागले आहे. त्यांना थांबवा, अन्यथा आम्हाला नाईलाजाने न्यायालयात जावे लागेल,'' असा इशाराच जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला आहे.