कंत्राटदाराकडून खंडणी घेताना भाजपायुवा मोर्चाचा कार्यकर्ता अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 08:00 PM2018-11-05T20:00:07+5:302018-11-05T20:00:21+5:30
औरंगाबाद : इंडो जर्मन टुल रूम येथील केटरिंगचा कंत्राट चालविणाऱ्याकडून दहा हजार रुपये खंडणी घेताना भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी रात्री सिडको एन-५ येथे सिडको पोलिसांनी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत देवीदास पंडित (२३ , रा.दिवाणदेवडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
औरंगाबाद : इंडो जर्मन टुल रूम येथील केटरिंगचा कंत्राट चालविणाऱ्याकडून दहा हजार रुपये खंडणी घेताना भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई रविवारी रात्री सिडको एन-५ येथे सिडको पोलिसांनी केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. प्रशांत देवीदास पंडित (२३ , रा.दिवाणदेवडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी म्हणाल्या की, तक्रारदार लेखराजसिंग निहालसिंग (वय ६८,रा. श्रीनगर, उल्कानगरी)यांचे इंडो जर्मन टुल रूम येथे केटरिंगचे कंत्राट आहे. अनेक वर्षांपासून तेथे त्यांचीच के टरिंग आहे. ही बाब भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेल्या आरोपी प्रशांत यास समजली. दरवर्षी केटरिंगचे कंत्राट लेखराजसिंग यांनाच कसे दिले जाते, असे पत्र प्रशांत पंडित याने इंडो जर्मन टुल रूमप्रशासनाला पत्र दिले होते. त्यांनतर आरोपीने तक्रारदार यांना बाहेर येऊन भेटण्याचे सांगितले.
दोन दिवसापूर्वी तक्रारदार यांनी आरोपीची भेट घेतली. तेव्हा आपण भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी आणि विद्यार्थी आघाडी शहर जिल्हा उपाध्यक्ष असल्याचे त्याने सांगितले. तुम्हालाच दरवर्षी हे टेंडर कसे मिळते. तुमच्याविरुद्ध केलेली मागे घ्यायची असेल तर दरमहा पन्नास हजार रुपये द्यावे लागतील. तडजोडअंती प्रशांतने २५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविली. याप्रकरणी लेखराजसिंग यांनी सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.
सिडको एन-५, टाऊन सेंटर येथे तक्रारदाराचे कार्यालय आहे. कार्यालयात ते असताना प्रशांतने त्यांना पुन्हा खंडणीची मागणी केली आणि पैसे घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. ही बाब कळताच सिडको पोलिसांनी साध्या वेशातील उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, प्रकाश् डोंगरे, संतोष मुदिराज यांनी तक्रारदार यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला. त्यावेळी आरोपीने त्यांच्याशी पुन्हा तडजोड करीत खंडणीचे दहा हजार रुपये घेतले. खंडणीची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी सिडको ठाण्यात प्रशांतविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक उपनिरीक्षक आधाने हे तपास करीत आहे.
आरोपी निघाला चहाविक्रेता
संश्यित आरोपी प्रशांत पंडित हा चहाविक्रेता असल्याचे उघडकीस आले असून, त्याची सिडकोत चहा टपरी असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. शिवाय भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून वावरत असल्याचे आढळून आले.