पाणीप्रश्नावर भाजप आक्रमक, महापालिका प्रशासक पांडेय यांच्या घरासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:40 PM2022-04-04T12:40:18+5:302022-04-04T12:43:05+5:30
सिडको आणि हडको येथील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
औरंगाबाद : शहरातील पाणीप्रश्नासंबंधी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे सिडको येथील जलकुंभासमोर आज सकाळी आंदोलन झाले. मात्र, प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त आंदोलकांनी थेट महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या घरासमोर धरणे दिली.
औरंगाबाद येथील सिडको आणि हडको येथील नागरिकांना मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कमी दाबाने पाणी पुरवठा, अधिकारी-कर्मचारी यांची उद्धट वागणूक, नियमित पाणीपुरवठा करावा या मागण्यांसाठी येथील नागरिकांनी आज सकाळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सिडको येथील जलकुंभासमोर आंदोलन केले. मात्र, आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महापालिकेचे प्रशासनाकडून कोणीच आले नाही. यामुळे संतप्त आंदोलकांनी थेट प्रशासक पांडेय यांचे घर गाठत तेथे आंदोलन सुरु केले.
येथे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासमोर नागरिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. राज्यात सर्वात जास्त पाणीपट्टी शहरवासीय देत आहेत, तरीही नियमित पाणी पुरवठा होत नाही, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही, याची तक्रार केली असता महापालिका अधिकारी- कर्मचारी उद्धतपणे वागणूक देतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. यावेळी आमदार अतुल सावे यांच्या हस्ते प्रशासक पांडेय यांना नागरिकांचे निवेदन देण्यात आले.