महावितरणच्या विरोधात भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:05 AM2021-02-06T04:05:41+5:302021-02-06T04:05:41+5:30
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी भाजपच्या वतीने वीजबिल माफीसाठी महावितरणच्या सिडको व वाळूज कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात शुक्रवारी भाजपच्या वतीने वीजबिल माफीसाठी महावितरणच्या सिडको व वाळूज कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने वाळूज उद्योगनगरीतील अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने बहुताश ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाही. राज्य शासनाच्या वतीने वीजबिल माफीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र शासनाने वीज माफीचा निर्णय फिरविल्याने हजारो वीजग्राहकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आता थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. लॉकडाऊन काळातील भरमसाठी वीजदेयके माफ करण्यात यावी व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, यासाठी शुक्रवारी वाळूज सबस्टेशनच्या कार्यालयात माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अविनाश गायकवाड, अमोल शिंदे, अमोल डहाळे, सचिन मुंडे, सागर काटे, अक्षय खरात, कृष्णा डहाळे, सुरेश वल्ले, सिंधू कापसे, सपना एल्लारे, सारिका धोपटे, कविता बनकर, सविता जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता.
सिडको महानगरात आघाडी सरकारचा निषेध
सिडको वाळूज महानगरातील महावितरणच्या कार्यालयासमोरही भाजपने आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी सहायक अभियंता एस. एस. उखंडे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अनिल चोरडिया, तालुकाप्रमुख वसंत प्रधान, ज्योती चोरडिया, सतीश पाटील, गजानन नांदुरकर, संभाजी चौधरी, मदन काळे, मोहसीन सलामपुरे, अंकुश आदमाने, तारासिंग तरय्यावाले आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- वाळूजला भाजपच्या वतीने वीजबिल माफीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करून अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
फोटो क्रमांक-निवेदन