भाजपाचा बार, राष्ट्रवादी गार !

By Admin | Published: October 20, 2014 12:12 AM2014-10-20T00:12:59+5:302014-10-20T00:34:13+5:30

प्रताप नलावडे , बीड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली.

BJP's bar, nationalist pride! | भाजपाचा बार, राष्ट्रवादी गार !

भाजपाचा बार, राष्ट्रवादी गार !

googlenewsNext


प्रताप नलावडे , बीड
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली. बहुरंगी निवडणूक असे म्हटले जात असले तरी विजयासाठीची झुंज राष्ट्रवादी आणि भाजपामध्येच झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडला.
सर्वच पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यामुळे मतांचे झालेले विभाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभुतीचा फायदा, मोदी यांच्या सभेनंतर तयार झालेले वातावरण, मतदारांची नाराजी आणि जातीची समिकरणे असे अनेक मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले.
परळी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. बीड मतदारसंघातील एकमेव जागा राष्ट्रवादीला राखता आली. भाजपाचे विनायक मेटे यांनी रा.कॉ.चे जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर तगडे आव्हान ठेवले होते. क्षीरसागर यांची प्रचाराची आणि संपर्काची पध्दतशीर यंत्रणा, त्यांची स्वत:ची जनमानसातील चांगली प्रतिमा आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांची असलेली ओळख अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. पहिल्या फेरीपासूनच मेटे आणि क्षीरसागर यांच्यातील कडवी झुंज शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली. पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये मेटे आघाडीवर राहिले मात्र त्यानंतर दहाव्या फेरीपासून क्षीरसागारांनी घेतलेली मतांची आघाडी वाढतच राहिली. अटीतटीच्या सामन्यात क्षीरसागर यांनी ६ हजार १३२ मताधिक्य मिळवित मेटेनां अस्मान दाखविले.
आष्टीत रा.कॉ.चे सुरेश धस आणि भाजपाचे भीमराव धोेंडे यांच्यात असाच अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या फेरीपासून सुरेश धस यांनी मतांची आघाडी घेतली, परंतु १८ व्या फेरीत धोंडे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर कधी धोंडे पुढे तर कधी धस पुढे अशी स्पर्धा शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. धोंडे यांनी ५ हजार ९८२ इतक्या मतांचा धक्का धस यांना देत विजयश्री अक्षरश: खेचली. गेवराईत पंडितांच्या एकछत्र अमल मोडीत काढत बदामराव पंडित यांना भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी ६० हजारांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळविला. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवित भाजपाच्या आर.टी. देशमुख यांनी विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर राहिले. केजमध्ये संगीता ठोंबरे यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. परळीतही पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी आघाडी कायम ठेवत २६ हजार मतांनी अपेक्षित विजय मिळविला.

Web Title: BJP's bar, nationalist pride!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.