मंदीर उघडण्यासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदीरासमोर भाजपचे घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 04:09 PM2021-08-16T16:09:54+5:302021-08-16T16:10:51+5:30
भाजप आध्यात्मिक आघाडी सातत्याने मंदिरे उघडण्यासाठी आग्रही आहे.
खुलताबाद: राज्य शासनाने सर्व व्यवहार सुरळीत केले असले तरी मंदिरे मात्र उघडले नाही. राज्यातील सर्व मंदीर तात्काळ उघडण्यात यावे यासाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्यावतीने बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरासमोर घंटानाद आंदोलन आज सोमवारी सकाळी करण्यात आले. ( BJP's bell ringing agitation in front of Ghrishneshwar temple in Ellora to open the temple)
राज्य सरकारने सर्व व्यवहार सुरु केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. भाजप आध्यात्मिक आघाडी सातत्याने मंदिरे उघडण्यासाठी आग्रही आहे. पहिल्या श्रावण सोमवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता दि. १६ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार असल्याने या दिवशी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र वेरुळ येथील श्रीघृष्णेश्वर महादेव मंदिरासमोर भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले तसेच मराठवाडा संयोजक संजय जोशी आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वात मंदिरे उघडण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी ठेवला होता.