भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:00 PM2024-08-31T12:00:20+5:302024-08-31T12:01:11+5:30

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा

BJP's big plan! 16 MLAs from Jharkhand, Chhattisgarh entered in Chhatrapati Sambhajinagar | भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

भाजपाचा मोठा प्लॅन! झारखंड, छत्तीसगडचे १६ आमदार छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल

छत्रपती संभाजीनगर: झारखंड, छत्तीसगड विधनसभेतील तब्बल १६ आमदार शुक्रवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार भाजपाचे असून त्यांच्यासोबत पक्षाचे काही उच्चपदाधिकारी देखील असल्याची माहिती आहे. शहरातील दोन हॉटेलमध्ये निवास आणि बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही हॉटेल बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त असून ही बैठक आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मोठी रणनीती ठरवत असल्याची माहिती आहे. राज्यातील विभागवार तयारीच्या अनुषंगाने भाजपने मराठवाड्यात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून झारखंड, छत्तीसगड येथील भाजपाचे तब्बल १६ आमदार छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत दाखल झाले. यावेळी छत्तीसगड भाजपाचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत. शहरातील दोन मोठ्या हॉटेलमध्ये सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये निवास तर दुसऱ्या हॉटेलमध्ये बैठकीची व्यवस्था आहे.  स्थानिक भाजपा पदाधिकारी समीर राजूरकर आणि अहमदनगर येथील प्रकाश गांधी येथील समन्वयक आहेत. आज सकाळी ११ वाजेपासून राज्यातील भाजपा पदाधिकारी आणि झारखंड, छत्तीसगडचे आमदार, पदाधिकारी यांची एक महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. ही बैठक आगामी विधानसभेच्या तयारीचा भाग असल्याची माहिती आहे. 

मराठवाड्यातील २५ जागांवर लक्ष
भाजपाने मराठवाड्यातील विधानसभेच्या २५ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवर विजय कसा मिळवायचा यावरच या बैठकीत खल होणार आहे.  बैठकीत उपस्थित झारखंड, छत्तीसगडमधील आमदार आणि भाजपा पदाधिकारी यांना या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असून त्यांच्यासोबत देखील या सर्वांची बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 

Web Title: BJP's big plan! 16 MLAs from Jharkhand, Chhattisgarh entered in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.