भाजपचे चक्काजाम आंदोलन म्हणजे पेट्रोल-डीझेलची बचत; हरिभाऊ बागडेंचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 07:44 PM2021-06-26T19:44:56+5:302021-06-26T19:46:11+5:30
Haribhau Bagade : फुलंब्री तालुका भाजप व ओबीसी आघाडीच्यावतीने शनिवारी ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनास आ. हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले.
औरंगाबाद : भाजपच्यावतीने ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर विधान सभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजब दावा केला आहे. या चक्काजाम आंदोलनामुळे राज्यभरात पेट्रोल आणि डीझेलची बचत झाली असल्याचा अजब दावा हरिभाऊ बागडे यांनी आंदोलनादरम्यान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
देशभरा इंधन दरवाढ झाल्याने विविध पक्ष संघटनांनी याविरोधात आंदोलने केली. सर्वसामान्य जनता यामुळे महागाईच्या भडक्याने त्रस्त झाली. अशा वेळी भाजपकडून इंधन दरवाढीवर कोणीच व्यक्तव्य केले नाही. मात्र आता ओबीसी आरक्षणाच्या चक्काजाम आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आमदार हरिभाऊ बागडे यांनी इंधन बचतीवर अजब दावा केला आहे. फुलंब्री तालुका भाजप व ओबीसी आघाडीच्यावतीने शनिवारी ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनास आ. हरिभाऊ बागडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपचे चक्काजाम आंदोलन म्हणजे एक प्रकारे इंधन बचतच असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्याने भाजप सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या इंधन दरवाढीवर हि आंदोलन करेल का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.
आंदोलनात भाजप तालुका अध्यक्ष सुहास सिरसाठ,जीप सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर,जितेंद्र जैस्वाल,अनुराधा चव्हाण,सभापती सविता फुके,महिला आघाडी अध्यक्ष ऐश्वर्या अभिषेक गाडेकर,हौसाबाई काटकर,सोनाली सोनवणे,राजेंद्र काळे,योगेश मिसाळ ,नरेंद्र देशमुख,सर्जेराव मेटे,बाळासाहेब तांदळे,कृष्णा गावंडे,एकनाथ ढोके,संतोष तांदळे ,रवींद्र काथार ,राम बनसोड,विलास उबाळे ,सुमित प्रधान,रवींद्र गायकवाड,बाबासाहेब शिनगारे,मयूर कोलते ,राजेंद्र डकले सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते.
भुजबळांच्या बुद्धीची कीव येते
राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही. तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हि रद्द झाले. निवडणुकीत ओबीसी जागेवर कोणते व किती उमेदवार उभे राहिले याचा डाटा राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. असे असताना छगन भुजबळ हे केंद्र सरकार आम्हाला डाटा देत नाहीत असे म्हणत आहेत. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते अशी टीका हरिभाऊ बागडे यांनी यावेळी लगावला.