भाजपाची भूमिका ठरणार निर्णायक !
By Admin | Published: March 5, 2017 12:35 AM2017-03-05T00:35:22+5:302017-03-05T00:36:21+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील महापौर पदाच्या निवडीसंदर्भातील तिढा सुटल्याने आता जिल्ह्यातील प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हालचालींना सुरूवात केली असून, जिल्हा परिषदेच्या सत्तेचा कौल भाजपाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने चित्र आहे.
यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख चारही पक्षांनी स्वबळावर लढली. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आली असून, त्यांच्याकडे २६ सदस्य आहेत. तर सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काँग्रेसची या निवडणुकीत पिछेहाट झाली असून, शिवसेनेकडे तेरा, तर काँग्रेसकडे अकरा सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी २८ सदस्यांची आवश्यकता असल्याने राष्ट्रवादीला आणखी दोन तर सेना-काँग्रेसला चार सदस्यांची आवश्यकता आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद स्वबळावर लढलेल्या भाजपाच्या जागा यंदा दुप्पट झाल्या असल्या तरी त्यांच्या हातीही केवळ चार सदस्य आहेत. मात्र, भाजपाचे हे चार सदस्यच जिल्हा परिषदेतील सत्तेचा कौल ठरविण्यासाठी आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
राष्ट्रवादी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीनेही हालचाली सुरू केल्या आहेत. एक अपक्ष सदस्य निवडून आला असला तरी बहुमत गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घेणे अपरिहार्य असल्याने राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी भाजपाचीच मदत घ्यावी लागेल. तशीच परिस्थिती शिवसेना-काँग्रेसची आहे. २४ सदस्यबळ असलेल्या शिवसेना-काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी चार सदस्यांची आवश्यकता असून, भाजपाने शिवसेना-काँग्रेसच्या बाजुने भूमिका घेतल्यास ते सत्तेत येवू शकतात. अशा परिस्थितीत भाजपाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. २१ मार्च रोजी विशेष सभा असल्याने सत्तेचे नेमके गणित तेव्हाच स्पष्ट होणार आहे.