सांस्कृतिक मंडळावर भाजपचे पहिल्यांदाच शक्तिप्रदर्शन; अमित शाह यांच्या सभेकडे साऱ्यांचे लक्ष
By विकास राऊत | Published: March 5, 2024 04:27 PM2024-03-05T16:27:18+5:302024-03-05T16:29:51+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज सभा; तीन जिल्ह्यांतून होणार सभेला गर्दी
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून अडीच दशकांत पहिल्यांदाच भाजप-शिंदे गट शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत असून आज, मंगळवारी होणाऱ्या सभेच्या निमित्ताने भाजप जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेतून भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. सभेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांतून गर्दी होणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ५० हजार नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी सभास्थळी बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास होणाऱ्या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. पंकजा मुंडे, विजया रहाटकर, महायुतीचे सर्व आमदार या सभेला उपस्थित राहणार आहेत. यासह छत्रपती संभाजीननगर, अहमदनगर व जालना जिल्ह्यांतील प्रमुख नेते, पदाधिकारी सभेसाठी हजर असतील. २६ फेब्रुवारीपासून भाजपने सभेच्या नियोजनासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचे फलित ५ मार्चला दिसेल.
५० हजार नागरिकांची आसन व्यवस्था
सभा जरी भाजपची असली तरी महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, नेते उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक मंडळावर सुमारे ५० हजार नागरिक बसतील, एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सभा होण्याचे निश्चित झाल्यापासून भाजपची पूर्ण यंत्रणा नियोजनासाठी कार्यरत आहे.
-शिरीष बोराळकर, भाजप शहर-जिल्हाध्यक्ष