‘भाजपचे सरकार आता युवकच खाली खेचतील’- धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:50 PM2018-02-11T23:50:57+5:302018-02-11T23:51:12+5:30
‘ज्या युवकांनी भाजपला सत्तेवर बसवले तेच युवक आता हे सरकार खाली खेचतील. ६ कोटी युवकांना नोक-या देण्याचे आश्वासन पाळणे तर दूरच, पण त्यांना पकोडा तळण्याचा सल्ला देऊन हे सरकार त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे. हे सहन न करण्यापलीकडचे असून, युवकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदतोय’अशी संतप्त प्रतिक्रिया आज येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘ज्या युवकांनी भाजपला सत्तेवर बसवले तेच युवक आता हे सरकार खाली खेचतील. ६ कोटी युवकांना नोक-या देण्याचे आश्वासन पाळणे तर दूरच, पण त्यांना पकोडा तळण्याचा सल्ला देऊन हे सरकार त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे. हे सहन न करण्यापलीकडचे असून, युवकांमध्ये सध्या प्रचंड असंतोष खदखदतोय’अशी संतप्त प्रतिक्रिया आज येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
सिडकोतील विनोद पाटील यांच्या घरासमोर गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या राष्टÑवादी युवक काँग्रेसच्या उपहासात्मक अमित शहा पकोडा सेंटरला भेट देऊन व तेथील काही पकोडे खाऊन झाल्यानंतर मुंडे हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पकोडेही तळले. यावेळी युवकांनी आर्टस् पकोडा- २० रु., सायन्स पकोडा- २० रु., इंजिनिआर पकोडा - २० रु. असे फलक झळकवले होते. तसेच बँडपथक ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे आळवत होते. ‘या थापाड्या सरकारचं करायचं काय..... खाली मुंडकं वर पाय’, ‘नरेंद्र मोदी-अमित शहा काय सांगतात.....बेरोजगारांनो पकोडे तळून पोट भरा म्हणतात’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या देशात फक्त एकाच युवकाला रोजगार मिळाला. तो म्हणजे अमित शहा यांचा मुलगा जय शहा. त्याचा धंदा मात्र कैकपटींनी वाढला. मोदी-शहा यांना युवकांची ही थट्टा महागात पडेल, असा इशाराही मुंडे यांनी दिला. प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की, बीडमध्ये जयदत्तअण्णा क्षीरसागर हे भाजपला मदत करीत आहेत.
विनोद पाटील, अभिजित देशमुख, दत्ता भांगे, विनोद बनकर, शेख असिफ वसी मणियार, बलदेव बोंबले, कैलास कुंटे, बाळासाहेब औताडे, रहिम पटेल, धीरज पाटील, विकास श्ंिदे, अक्षय शिंदे, गजानन पाटील, मयूर सोनवणे, श्रीकांत बोराडे, संदीप कानडे, विकास ठाले, रवींद्र काळे, मयूर कुºहाडे, शुभम गाडेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले.
राणेंची चेष्टा महाराष्टÑ पाहतोय...
नारायण राणे यांचा स्वाभिमान आता भाजपने कितपत ठेवलाय... उभा महाराष्ट्र नारायण राणे यांची भाजपने चालवलेली चेष्टा पाहतोय, असे यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ज्यादिवशी राणे यांनी काँग्रेस सोडली, त्या क्षणाला त्यांना मंत्रीपद द्यायला हवं होतं. पण आता त्यांना सडवलं जातंय.
औरंगाबादला राणे यांची आज सभा होती. यासंदर्भात मुंडे यांनी सांगितले की, आता सामान्य माणसांवर अशा सभांचा काहीच परिणाम होणार नाही.