भापकरांची बदली रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:08 AM2018-02-06T01:08:07+5:302018-02-06T01:08:11+5:30
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मुंबईला झालेली बदली भाजपच्या धुरीणांनी थांबविण्यात बाजी मारली आहे, असा आरोप शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मुंबईला झालेली बदली भाजपच्या धुरीणांनी थांबविण्यात बाजी मारली आहे, असा आरोप शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा सूरही शिवसेनेने आळविला.
भापकरांची बदली रोखण्यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी मोट बांधल्याची चर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या बैठकीत होती.
विभागीय आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर हे पुण्याहून सोमवारी पदभार घेण्यासाठी येणार होते. परंतु शासनाने त्यांना रुजू न होण्यास सांगितले. शिवाय डॉ.भापकर यांच्या बदलीला सोमवारी स्थगिती दिली. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, यासाठी राजकारणी, भूमाफियांनी पूर्ण ताकद लावल्याची चर्चा आहे.
शनिवारी डॉ.भापकर यांची बदली राज्यातील १२ सनदी अधिका-यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सगळ्या बदल्यांत भापकरांची बदली होण्यामागे वर्ग-२ जमीन विक्री व्यवहारात अनियमितता केल्यावरून उपजिल्हाधिका-यांचे निलंबन व इतर वाद असल्याचे बोलले गेले. वर्ग-२ च्या २२५ पैकी ११८ प्रकरणांत अजून तरी डॉ.भापकर यांनी निलंबनाव्यतिरिक्त कुठलीही कारवाई केलेली नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ.भापकर यांची बदली होणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शासनाने धक्का दिल्याचे बोलले गेले. रविवारचा पूर्ण दिवस राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करून डॉ. भापकरांनी बदली रोखण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. त्यात त्यांना यश
आले.