पूरस्थिती असली तरी पुन्हा भाजपची महाजनादेश यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:23 PM2019-08-14T12:23:30+5:302019-08-14T12:37:34+5:30
महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे.
औरंगाबाद : राज्यातील पूरस्थिती अद्याप सुरळीत झालेली नसताना आणि राज्य सरकारकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २१ ऑगस्टपासून पुन्हा सुरु होणार आहे. महापुरातून मराठवाड्यातील दुष्काळी भागाकडे ही यात्रा प्रवास करणार आहे.
महापूर स्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘सेल्फी स्माईल’ करीत पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले. अर्धे राज्य पुरात बुडालेले असताना मुख्यमंत्री महाजनादेशात गुंतलेले असल्याची टीका विरोधकांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना यात्रा अर्धवट सोडून मुंबई गाठावी लागली. त्यांनी पूरपरिस्थितीतून कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला आदेश दिले. मात्र अद्यापही परिस्थिती गंभीर असताना आणि पुरानंतरच्या मदतीबाबत तसेच आरोग्याच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना झालेली नसताना महाजनादेश यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. त्यात काही बदल करण्यात आले आहेत. महाजनादेश यात्रा मराठवाड्यातील ३२ मतदारसंघांतून जाणार आहे. आता ही यात्रा २१ ते ३१ ऑगस्टपर्यंत आहे. विभागात १६ आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे १५ आमदार आहेत. ३२ मतदारसंघ यात्रेच्या माध्यमातून ढवळून काढल्यानंतर जो जनादेश भाजपच्या पदरी पडेल त्यावर शिवसेनेसोबत युती करायची, की स्वतंत्र लढायचे, याबाबत पक्षांतर्गत चिंतन होण्याची शक्यता आहे.
स्वबळाची चाचपणी
२१ ऑगस्ट रोजी आष्टी मतदारसंघातून यात्रेचा मराठवाड्यात प्रवेश होईल. तेथून बीड, गेवराई तेथून पुढे अंबड व बदनापूर या भागातून औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सभा होईल. फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन, जालना, मंठा, सेलू, पाथरी, मानवत, परभणीत भाजपची हवा करण्यात येईल. नंतर औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, अर्धापूर, नांदेड, लोहा, अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा, उस्मानाबाद व तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याकडे ही यात्रा रवाना होईल. १० दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या काही मतदारसंघांत सभा होणार आहेत. या सभांमधून स्वबळाची चाचपणी करण्यात येईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.