भाजपचे मिशन इलेक्शन; चार मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फार्म हाऊसवर ‘गेट टुगेदर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:27 PM2021-11-27T17:27:31+5:302021-11-27T17:27:50+5:30
भाजपाच्या गेट टुगेदरमध्ये चार मतदारसंघातील वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अधिकाऱ्यांपासून सगळ्यांचा समावेश होता
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीने मिशन इलेक्शन गांभीर्याने घेतले असून शहरातील चारही मतदारसंघातील वॉर्ड अध्यक्ष, मंडळ अधिकाऱ्यांचे स्नेहमिलन शहरातील एका फार्म हाऊसमध्ये आयोजित केले. मागील तीन दिवस दिवाळी स्नेहसंमेलनातून पक्षाने अंतर्गत दुरावे दूर करीत सगळ्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला असून पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यात येणार असल्याचे आ. अतुल सावे यांनी सांगितले.
आगामी काळात होणाऱ्या मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांची भाजप तयारी करण्यात येत आहे. शहरातही निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपतर्फे दिवाळी स्नेहमिलनच्या माध्यमातून पूर्व, पश्चिम आणि मध्य, फुलंब्री मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांतील अंतर्गत मतभेददेखील यातून दूर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिमायतबागेतील एका फार्महाऊसवर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्रिकेट स्पर्धा, संगीत रजनी, विविध स्पर्धांसह भोजनाच्या मेजवानीचा उपक्रम घेण्यात आला. हा सगळा कार्यक्रम गुप्त होता. यात बाहेरच्या कुणालाही सहभागी केलेले नव्हते. पक्षाच्या १२ मंडळांतर्गत येणाऱ्या वॉर्ड अध्यक्षांपासून सर्व पदाधिकारी सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.पहिल्या दिवशी पूर्व मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या दिवशी पश्चिम, तर तिसऱ्या दिवशी मध्य आणि फुलंब्री मतदारसंघातील मनपा हद्दीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
आ. अतुल सावे म्हणाले, हा उपक्रम निवडणुका म्हणून घेतला नाही, तर पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कुटुंब भावनेतून आणि खिलाडू वृत्तीने एकत्र यावेत, यासाठी चारही मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले. आगामी काळात ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसाठीही असा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
आठवण ‘त्या’ निवडणुकीची
‘ते’ फार्महाऊस शिवसेनेच्या एका उपजिल्हाप्रमुखाच्या बंधूंचे आहे. त्याच फार्महाऊसवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराची एक बैठक झाल्याची चर्चा होती. त्या बैठकीचा उद्देश फळाला आलाच नाही, शिवाय शिवसेनेचा उमेदवारही पडला. आता त्याच फार्म हाऊसमध्ये भाजपाने गेट टुगेदर केल्यामुळे २०१९ च्या बैठकीच्या आठवणी ताज्या झाल्या.