होर्डिंग धोरणात महापुरुषांच्या आडून सेना नेत्यांचे वाढदिवस; औरंगाबाद मनपाच्या यादीवर भाजपचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:28 PM2018-08-27T19:28:15+5:302018-08-27T19:29:31+5:30
शहरात अनधिकृत होर्डिंग लागू नयेत म्हणून महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच होर्डिंगचे धोरण निश्चित केले.
औरंगाबाद : शहरात अनधिकृत होर्डिंग लागू नयेत म्हणून महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच होर्डिंगचे धोरण निश्चित केले. यामध्ये विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होर्डिंग लावण्याची मुभा दिली आहे. त्यात ३ सेना नेत्यांची नावे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपने या यादीवर तीव्र आक्षेप नोंदविला असून, महापुरुषांच्या आड सेना नेत्यांची नावे कशासाठी टाकण्यात आली, ही नावे त्वरित काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहरात पूर्वी भाऊ, दादांच्या बेकायदा होर्डिंग्जचे अक्षरश: पेव फुटले होते. प्रत्येक चौक, प्रमुख रस्त्यांवर बेकायदा होर्डिंग्जचा विळखा पडल्यामुळे न्यायालयाने बेकायदा होर्डिंग्ज हटविण्याचे महापालिकेला वारंवार आदेश दिले; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात येत नव्हती. अखेर न्यायालयाने अवमान कारवाईचा इशारा दिल्यानंतर गेल्या महिन्यात सुमारे आठ हजार होर्डिंग्ज, बॅनर्स, फलक काढण्यात आले.
होर्डिंग्जचे धोरण ठरविण्यासाठी प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव सादर केला होता. त्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त होर्डिंग्ज लावण्याची परवानगी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, अशा ठिकाणी दिली जाईल, असे नमूद केले होते; मात्र प्रस्ताव मंजूर करताना महापौरांनी गटनेत्यांकडून कोणकोणत्या दिवशी होर्डिंग लावण्याची मुभा द्यावी म्हणून यादी घेतली. या यादीनुसार ७८ दिवस होर्डिंग्ज, बॅनर्सला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापुरुषांच्या नावासोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खासदार चंद्रकांत खैरे, आदित्य ठाकरे, आ. संजय शिरसाट, शिवसेनेचा वर्धापन दिन अशा नावांचा प्रस्तावामध्ये समावेश करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपने या विरोधात भूमिका घेतली आहे. याबाबत उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला आहे. माजी स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांनीही यादी बदलण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचाही आक्षेप
महापालिकेने होर्डिंग लावण्यासाठी जाहीर केलेल्या यादीमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, औरंगाबाद पश्चिमचे आमदार आ. संजय शिरसाट यांचा समावेश आहे. या यादीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक देशमुख यांनीही आक्षेप घेतला आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांना आपापल्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करायचे असतात. केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांची नावे यादीत असतील तर ती एकाधिकारशाही आहे. आमच्या पक्षाचे नेते खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रियाताई सुळे यांची नावे नसतील तर त्याला आमचा आक्षेप आहे. यासंदर्भात आम्ही आयुक्तांकडे दाद मागू. महापुरुषांची यादी असेल तर त्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश नको आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश असेल तर ती यादी सर्वसमावेशक असावी. महापालिकेने याबाबत काही धोरण आखले आहे, असे दिसत नाही. शिवसेनेने मनमानी पद्धतीने यादी तयार केली आहे, असेही देशमुख म्हणाले.