मराठवाड्यातून भाजपचे एकमेव मंत्री, अतुल सावे दुसऱ्यांदा राज्य मंत्रीमंडळात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:42 PM2022-08-09T14:42:17+5:302022-08-09T14:49:02+5:30
अतुल सावे फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टप्प्यात चार महिन्यांसाठी राज्यमंत्री होते.
औरंगाबाद: शिंदे- फडणवीस मंत्रिमंडळाचा आज कॅबिनेट विस्तार पार पडला. आज एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात मराठवाड्यातून चार आमदारांची वर्णी लागली आहे. विभागात शिंदे गटाचे वर्चस्व दिसत असताना भाजपकडून केवळ अतुल सावे हे एकमेव नाव मंत्रिमंडळात आहे. अतुल सावेऔरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांचा राज्य मंत्रिमंडळ समावेश होताच शहर भाजपने गुलमंडी येथे जल्लोष केला.
अतुल सावे फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टप्प्यात चार महिन्यांसाठी राज्यमंत्री होते. त्यानंतर आज त्यांना दुसऱ्यांदा मंत्रीमंडळात समावेश झाला असून यावेळी त्यांना कॅबिनेट पदी बढती देण्यात आली आहे. सावे हे औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपने सावे यांना मंत्रीकरून आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. शहरातून भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्यानंतर भाजपने सावे यांच्या माध्यमातून तिसरे मंत्रिपद दिले आहे . तीन मंत्रिपदाच्याद्वारे आगामी काळात भाजप शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद आणि राष्ट्रवादीचे प्रस्थ असलेल्या मराठवाड्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मदत होणार होईल. दरम्यान, शपथविधीनंतर मंत्री सावे यांनी, मराठवाड्याचा मागील अडीज वर्षात थांबलेला विकास पुन्हा सुरु होईल असा विश्वास व्यक्त केला. मागील वेळी चार महिनेच संधी मिळाली होती. आता मोठी संधी असून विकासात्मक कामे करण्यास प्राधान्य देऊ, अस निर्धार सावे यांनी व्यक्त केला.
सावेंच्या घरी आंदोत्सव, भाजपकडून जल्लोष
मंत्रीपदी वर्णी लागल्याने अतुल सावे यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. भाजपने देखील गुलमंडी येथे जल्लोष केला. सावे यांच्या आईने आज सकाळी मुलासोबत बोलणे झाले होते. मंत्रीपद मिळाल्याने आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच सावे यांच्या वहिनी आणि पुतणे यांनी शहर आणि मराठवाड्याच्या विकासात मंत्रीपदाने भर पडेल, अशा भावना व्यक्त केल्या.